डॉक्टरांनी रुग्णांना जन औषधी प्रिस्क्राईब करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

डॉक्टरांनी रुग्णांना जन औषधी प्रिस्क्राईब करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

· जन औषधी सप्ताह 1 ते 7 मार्च 2023

· जन औषधी- स्वस्त पण चांगली पण कर्करोग, मधुमेहावरही जन औषध उपलब्ध

 

भंडारा, दि. 6 : नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. गरजू रुग्णांचा औषधावर होणार खर्च आटोक्यात ठेवणे गरजेचे आहे. कारण ज्या कुटुंबाची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी औषधांवर झालेला खर्च भरून काढण्यासाठी मोठा कालावधी लागतो. डॉक्टरांनी जर रुग्णांना जन औषधी प्रिस्क्राईब केली तर रुग्णांना खुप मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांना जन औषधी प्रिस्क्राईब करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.

 

जन औषधी बाबत जनजागृती होण्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपक सोयाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर, जिल्हा साथरोग तज्ज्ञ डॉ. श्रीकांत आंबेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन चव्हान, स्त्री रोग तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष डॉ. भरत लांजेवार, आयएमए च्या सचिव डॉ. सुचिता वाघमारे, केमिस्ट व ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष संजय खत्री तसेच जेनेरिक औषध विक्रेते व त्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर पुढे म्हणाले, जन औषधी बाबत ग्रामीण भागात सुध्दा जनजागृती होणे गरजेचे आहे. जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांना कमीत कमी दरामध्ये औषधी उपलब्ध होण्याकरिता जन औषधी केंद्र वाढविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्रावर मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब ,जीवनसत्त्व विषयक औषधे, एंटीबॉयोटिक्स इत्यादी प्रकारची दर्जेदार व स्वस्त औषधी उपलब्ध आहेत. प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र, महल वार्ड, माकडे मोहल्ला, बँक ऑफ इंडिया जवळ, भंडारा येथे असून नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

 

मी व माझी पत्नी डायबिटीज व बि.पी. या आजाराची औषधी घेत आहे. सामान्य मेडीकल स्टोअर्स मधून एक महिन्याच्या औषधासाठी साधारण 4 हजार 500 रुपये खर्च होत होते. परंतु मी आता डायबिटीज व बि.पी. या आजाराची औषधी जन औषधी केंद्रातून खरेदी केली तर एक महिन्याची औषधी 1 हजार 162 रुपयांना मिळली. त्यामुळे माझी आर्थिक बचत होत आहे. – आर. एन. शर्मा, लाभार्थी