महिला दिन विशेष कृषी यशकथा 10 संकटावर मात करणारी कणखर कृषिकन्या खरबीच्या वंदना वैद्य गेल्या 25 वर्षापासून राबताहेत शेतात!

महिला दिन विशेष कृषी यशकथा 10 संकटावर मात करणारी कणखर कृषिकन्या खरबीच्या वंदना वैद्य गेल्या 25 वर्षापासून राबताहेत शेतात!

 

भंडारा दि. 6: घरचा कर्ता पुरुष आजारी पडला. घराची जबाबदारी तिच्यावर आली आणि तिने कुठेही न डगमगता परंपरागत असलेला शेतीचा व्यवसाय हाती घेतला. सुरुवातीला अडचणी आल्या मात्र कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून सेंद्रिय शेतीचा गवसलेला धागा आज तिचे आयुष्य विणून गेला. तीन एकरात विविध पद्धतीची पिके आणि तेही सेंद्रिय पद्धतीने घेणारी ही महिला शेतकरी आज नक्कीच शेती परवडत नाही असे छातीठोकपणे सांगणाऱ्यांसाठी आदर्श ठरू शकते. म्हणूनच तर तिच्या कर्तुत्वाचा गौरव येत्या महिला दिनी चक्क राज्याच्या उपराजधानीत होत आहे.

 

भंडारा तालुक्यातील खरबी या छोट्याशा गावातील वंदना सोपान वैद्य असे या महिला शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या 25 वर्षांपासून त्या शेती करीत आहेत. खरंतर शेती ही पुरुषांची मक्तेदारी म्हणून ओळखली जाते. परंतु इथे जरा उलटे झाले. घरच्या कर्त्या पुरुषाचे आजारपण पाचवीला पुजले आणि आपसूकच वंदना यांना शेतात राबण्याची वेळ आली. पण त्यांनी याकडे संकट म्हणून न पाहता एक संधी म्हणून पाहिले. सुरुवातीला पीक कमी व्हायचे. चार हात पंप असतानाही पाण्याअभावी नुकसान सहन करावे लागत होते. त्यात त्यांना कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा मार्ग सापडला आणि शेतीची दिशा बदलली. सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा सल्ला दिला. यासोबतच पाण्याची अडचण दूर करण्यासाठी शेततळे तयार करण्याचा मार्ग कृषी विभागाने दाखविला. यासाठी वंदना यांनी गावातील अन्य शेतकऱ्यांना तयार केले. वंदना यांच्या शेतासह जवळपास दहा ते बारा शेतात शेततळे तयार झाले.

 

आज तीन एकरात या शेततळ्यामुळे तूर, हळद, धान, मिरची, चणा सारखे विविध पीक त्या घेत आहेत. पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने असल्याने येणारे उत्पादनही समाधानकारक येत असल्याचे त्या सांगतात. अडीच एकरात 70 पोते धान झाल्याचे त्यांनी सांगितले. तीन एकरात येणारे पीक माझे कुटुंब चालविण्यासाठी पुरेशी असल्याचे सांगताना आज शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्यांसाठी वंदना यांचा आदर्श नक्कीच देण्यासारखा आहे. शेतीचा व्यवसाय हा निसर्गाच्या मेहरबानी वर अवलंबून असतो. कधी कमी जास्त झाल्यास शेतीला दोष देऊन आलेले उत्पन्न जाळून किंवा फेकून टाकणे हे कदाचित आता तरीपणाचे होईल असेही त्यांचे म्हणणे आहे.

 

वंदना यांच्या 25 वर्षाच्या सक्रिय शेती कार्याची दखल घेत नागपूरच्या कृषी महाविद्यालयाने ही महिला दिनाचे औचित्य साधून 9 मार्च रोजी त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतलाय. ग्रामपंचायत सदस्य असलेल्या वंदना या सेंद्रिय शेती भात उत्पादक महिला गटाच्या सचिवही आहेत. त्यामुळे केवळ स्वतःचा नाही तर इतरही महिलांचा शेतीच्या माध्यमातून उद्धार व्हावा हीच भावना त्यांच्या मनी दिसते. आता ग्रामीण भागातून जाऊन राज्याच्या उपराजधानी सत्कार होत असेल तर अशी महिला शेतकरी नक्कीच जिल्ह्यासाठी भूषणावह म्हणावी लागेल.