वनांचे रक्षण व संवर्धन करण्‍यात वनपरिक्षेत्र अधिका-यांचा सिंहाचा वाटा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

वनांचे रक्षण व संवर्धन करण्‍यात वनपरिक्षेत्र अधिका-यांचा सिंहाचा वाटा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø वनपरिक्षेत्र अधिका-यांच्‍या राज्‍यस्‍तरीय अधिवेशनाला उपस्थिती

 

नागपूर / चंद्रपूर,दि. 28 : वनपरिक्षेत्र अधिकारी (आर.एफ.ओ.) हा वनखात्‍याचा अतिशय महत्‍वाचा भाग आहे. त्यांच्‍यामुळेच वनांचे रक्षण व संवर्धन होण्‍यास मदत होते, असे प्रतिपादन राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. फॉरेस्‍ट रेंजर्स असोसिएशन, महाराष्‍ट्र द्वारे आयोजित राज्‍यस्‍तरीय अधिवेशनात बोलताना ना. मुनगंटीवार बोलत होते. प्रत्‍येक आर.एफ.ओ. कडे वनविभागाची पूर्ण जबाबदारी असते व ती जबाबदारी पूर्ण गांभिर्याने प्रत्‍येक आर.एफ.ओ. पार पाडत असतो याचे मला समाधान आहे, असेही ते म्‍हणाले.

 

कार्यक्रमाला फॉरेस्‍ट रेंजर असोसिएशनचे महाराष्‍ट्र अध्‍यक्ष कांतेश्‍वर बोलके, अरुण तिखे, असोसिएशनचे सरचिटणीस नीलेश गावंडे, नागपूरचे मुख्‍य वनसंरक्षक रंगनाथ नायकडे, संस्‍थेचे संस्‍थापक अध्‍यक्ष विनोद देशमुख, संस्‍थेचे माजी सरचिटणीस किशोर मिश्रीकोटकर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी आर्यनमन विजेता विशाल बोदडे यांचा ना. मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. प्रास्‍ताविक करताना असोसिएशनचे सरचिटणीस श्री. गावंडे यांनी आर.एफ.ओ. चे विविध अधिकार व समस्‍यांवर सादरीकरण केले. यामध्‍ये मुख्‍यतः कर्मचारी वर्गांची कमी असल्‍यामुळे काम करण्‍यास अडचणी येतात तसेच वेतनश्रेणीवर सुध्‍दा त्‍यांनी सांगीतले.

 

ना. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले की, फॉरेस्‍ट सर्व्‍हे ऑफ इंडिया यांच्‍या एका अहवालानुसार महाराष्‍ट्राचे हरीत क्षेत्र 2550 स्‍वेअर किमीने वाढले आहे. तसेच मॅनग्रोजचे क्षेत्र सुध्‍दा वाढले आहे. वनक्षेत्राशी संबंधित ज्‍या गोष्‍टी चांगल्‍या होत आहेत. त्‍यामध्‍ये तुमचा तसेच वनविभागाच्‍या सर्व कर्मचा-यांचा सिंहाचा वाटा आहे. गेल्‍या काही वर्षात विदर्भात वाघांच्‍या संख्‍येत वाढ झाली आहे. त्‍यांचे संवर्धन व संरक्षण ही जबाबदारी सुध्‍दा तुम्‍ही सर्वजण उत्‍तम पध्‍दतीने करता ही आनंदाची गोष्‍ट आहे. वनविभागाच्‍या संवर्धनामध्‍ये तुमच्‍यासह सर्व कर्मचा-यांचा सिंहाचा वाटा आहे व महाराष्‍ट्र वनविभाग देशात नंबर एकवर राहण्‍यासाठी सर्वांनी प्रयत्‍न करावा, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी केले. या कार्यक्रमात आपण अनेक विषय मांडलेत. यात ब-याच मागण्‍या सुध्‍दा आहे, याचा सहानुभूतीपूर्वक विचार करेन, अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी याप्रसंगी दिली.