माविम स्थापित लोकसंचालित साधन केंद्र व ‘दिनशा’ करार संपन्न

माविम स्थापित लोकसंचालित साधन केंद्र व ‘दिनशा’ करार संपन्न

 

भंडारासह गडचिरोली जिल्ह्यातील दुध संकलन केंद्रांचा समावेश

 

भंडारा, दि.03: महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय भंडारा, गडचिरोली, नागपूर व दिनशा डेअरीच्या संयुक्त विद्यमाने दि. 2 फेब्रुवारी 2023 रोजी माविम प्रांगण बुटीबोरी येथे दुध संकलन केंद्रांतील दुध दिनशा डेअरीला देण्याकरिता भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील माविम स्थापित लोकसंचालित केंद्रांमध्ये करार प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

 

भंडारा जिल्ह्यातील 88 दुध संकलन केंद्राचे तर गडचिरोली जिल्ह्यातील 12 दुध संकलन केंद्रांचे दुध दिनशा डेअरीला देण्याकरिता करार करण्यात आले. याप्रसंगी दिनशा फुड प्रायव्हेट लिमिटेड बुटीबोरी नागपूर येथे लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्ष, व्यवस्थापक, दुध संकलन सखी, उपजीविका सल्लागार यांच्याकरिता दुध संकलन व प्रक्रीया उद्योगाची पाहनी करण्याकरिता अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान दिनशा डेअरीच्या प्लांटमध्ये उत्पादीत केल्या दुग्ध जन्य पदार्थ, बेकरी तसेच खाद्य पदार्थांची निर्मितीची पाहणी करण्यात आली. दिनशा दुध संकलन केन्द्रातुन दुध संकलन करेल तसेच दिनशाचे वेगवेगळे प्राडक्ट विक्री करिता उपलब्ध करुन देईल ज्याने महिलांच्या उत्पन्नात वाढ होईल. तसेच पशुखाद्य सुध्दा पुरवठा करेल. विविध प्रशिक्षणाचे आयोजन व दिनशा सल्लागार म्हणुन काम करेल.

 

या प्रसंगी माविम नागपूर विभागाचे विभागीय मूल्यमापन व संनियंत्रण अधिकारी राजू इंगळे, दिनशाचे उपाध्यक्ष डॉ. अजय उपाध्याय, यवतमाळचे वरीष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. रंजन वानखेडे, नागपूरचे वरीष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी ललिता दारोकर, भंडाराचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, गडचिरोलीचे जिल्हा समन्वय अधिकारी सचिन देवतळे, दिनाचे डॉ. संजय पाटीदार, गोविंद जांजळकर यांच्यासह लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्ष, व्यवस्थापक, दुध संकलन सखी, उपजीविका सल्लागार उपस्थित होते.

 

दिनशा प्लांट पाहणीनंतर माविम महिला प्रांगण, बुटीबोरी येथे करार प्रक्रिया बैठक घेण्यात आली. प्रास्ताविक प्रदीप काठोळे यांनी केले. विभागीय मूल्यमापन व संनियंत्रण अधिकारी राजू इंगळे यांनी मार्गदर्शन केले. दिनशाचे डॉ. संजय पाटीदार यांनी दुधाच्या व्यवसायासाठी पशु पालकांनी पशुंची काळजी घेणे, स्वच्छता ठेवणे याविषयी मार्गदर्शन केले. दिनशाचे उपाध्यक्ष डॉ. अजय उपाध्याय यांनी मनोगत व्यक्त केले. मार्गदर्शनानंतर दुग्ध व्यवसाय करणाऱ्या लोकसंचालित केंद्र व दिनशा डेअरी यामध्ये स्वच्छ व शुद्ध दुध संकलन करण्यासंदर्भात करार प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.