शेतकरी हा ‘बिझनेसमॅन’ व्हावा – जिल्हाधिकारी संदीप कदम महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे शेतकरी महिलांसाठी सहकुटुंब कार्यशाळा

शेतकरी हा ‘बिझनेसमॅन’ व्हावा – जिल्हाधिकारी संदीप कदम

  • महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे शेतकरी महिलांसाठी सहकुटुंब कार्यशाळा

भंडारा, दि 15 : जिल्ह्यातील शेतकरी हा पारंपरिक शेती करतो, त्यामुळे पिकांचे नियोजन करण्यात येत नाही. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, शेतकऱ्यांचा विकास व्हावा, शेतकरी हा ‘बिझनेसमॅन’ व्हावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले.

महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडारा जिल्हा कार्यालयाच्या वतीने आज जिल्ह्यातील महिला बचत गटातील कुटुंबाकरिता शेतीवर आधारित सेक्टर व सब सेक्टरनिहाय व्यवसायवृद्धी कार्यशाळा नियोजन भवनात आयोजित करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी संदीप कदम बोलत होते. यावेळी मंचावर मार्गदर्शक म्हणून भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, साकोलीचे उपविभागीय कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, लाखनीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. गुणवंत भडके, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, यशस्वी शेतकरी विनोद चकोले व अन्य अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, पारंपरिक शेतीचा उपयोग तंत्रज्ञान व आधुनिक पद्धतीने केल्यास उत्पादनात वाढ होऊ शकते. यादरम्यान यशस्वी शेतकऱ्यांचे उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. सोबतच यशस्वी शेतकऱ्यांचे व उद्योजकांच्या यशोगाथांचे सादरीकरण केले. यशस्वी शेतकरी विनोद चकोले यांनी त्यांच्या कामाचे अनुभव सांगितले.

भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी कृषी क्षेत्रातील प्रगतीसाठी महिला बचत गटांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. साकोलीचे उपविभागीय कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील विविध अनुभव सांगून मार्गदर्शन केले. लाखनीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. गुणवंत भडके यांनी पशुधन हा व्यवसायाचा महत्त्वाचा भाग आहे. पशुधनातून मोठे उद्योग निर्माण झाले असून यातूनही प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढेल, असे मत व्यक्त केले.

संचालन भावना डोंगरे यांनी केले. प्रास्ताविक व आभार माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी केले. यावेळी लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक, कार्यकारिणी सदस्य, सहयोगीनी व बचत गटातील महिला कुटुंबासह उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज केवट, शामराव बोंद्रे, महेंद्र गिलोरकर यांनी सहकार्य केले.