शेतकऱ्यांनी बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके खरेदी करतांना काळजी घ्यावी

शेतकऱ्यांनी बियाणे, रासायनिक खते व

कीटकनाशके खरेदी करतांना काळजी घ्यावी

भंडारा, दि. 23 :  शेतकऱ्यांना योग्य व उत्तम गुणवत्तेचे बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके पुरविण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी निविष्ठा खरेदी करतांना काळजी घेणे गरजेचे आहे. बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके परवाना धारक विक्रेत्यांकडून खरेदी करावे. संशयास्पद अथवा बनावट बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांची विक्री निदर्शनास येताच नजीकच्या कृषी कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अरुण बलसाने व कृषी विकास अधिकारी आर. आर. डोंगरे यांनी केले आहे.

            बियाणे खरेदी करतांना परवाना धारक विक्रेत्यांकडून खरेदी करावे. सिलबंद वेष्टनातील  लेबल असलेले बियाणे खरेदी करावे. खरेदी केलेल्या बियाणांबाबत संपूर्ण तपशिल जसे पीक, वाण, लेबल नंबर, वैध मुदत, बियाणे किंमत, खरेदीदाराचे, उत्पादकाचे नाव तसेच विक्रेत्याची सही, रोख अथवा उधारीची पावती घ्यावी. छापील किंमतीपेक्षा जादा दराने बियाणे खरेदी करु नये. विशिष्ट संशोधित वाणाचा आग्रह न धरता त्याच गुणधर्माचे अधिसूचित वाणाचे प्रमाणित बियाणे शक्यतो खरेदी करावे. बियाणे खरेदी केल्यावर खरेदीची पावती, वेष्टन व त्यावरील लेबल व पिशवीतील थोडेसे बियाणे हंगाम संपेपर्यंत जपून ठेवावे. बियाणे दर्जा, उगवन क्षमता, भौतिक शुध्दतेबाबत शंका आल्यास कृषी विभागाच्या नजीकच्या कार्यालयात तक्रार नोंदवावी.

            रासायानिक खते परवाना धारक विक्रेत्यांकडून खरेदी करतांना ई-पॉस मशिनव्दारे खते खरेदी करावीत. रासायनिक खते खरेदी केल्यावर विक्रेत्याकडून बिल पावती घ्यावी. खरेदी पावतीवर खताचे नाव, ग्रेड, किंमत व उत्पादाकाचे नाव याचा उल्लेख असणे अत्यंत आवश्यक आहे. खत खरेदी करतांना वजनाची खात्री करावी.  कीटकनाशके खरेदी करतांना ती सिलबंद असल्याची खात्री करावी तसेच रोखी अथवा उधारीची पावती घ्यावी. कीटकनाशके खरेदी बिलावर कीटकनाशकाचे नाव, उत्पादकाचे नाव, बॅच क्रमांक, वापराचा अंतिम दिनांक याचा उल्लेख बिलावर असणे आवश्यक आहे. याची खात्री करुनच बिलावर स्वाक्षरी करावी. कमाल किरकोळ विक्री किंमतीच्या अत्यंत कमी अथवा ज्यादा दराने विक्री होत असल्यास त्वरीत नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कृषी विभागाने कळविले आहे.