कुष्ठरोग जनजागृती अभियानचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

कुष्ठरोग जनजागृती अभियानचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

 

चंद्रपूर, दि. 31 : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ‘स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहीम’ 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी कुष्ठरोग निवारण पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्हास्तरीय समन्वय समितीचा आढावा घेतला.

 

बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम., आरोग्य सेवा (हिवताप) विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. श्याम निमगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, डॉ. संदीप गेडाम, जागतिक आरोग्य संघटनेच्या नागपूर विभागाच्या सल्लागार डॉ. भाग्यश्री त्रिवेदी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे, , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिलनाथ कलोडे आदी उपस्थित होते.

 

जिल्ह्यातील 502 गावांमध्ये गत पाच वर्षात कुष्ठरोगाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. 272 गावांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण, 342 गावांमध्ये प्रत्येकी 2 ते 3 रुग्ण, 148 गावांत प्रत्येकी 4 ते 5 रुग्ण आणि जिल्ह्यातील 335 गावांमध्ये प्रत्येकी पाच पेक्षा जास्त रुग्ण असल्याचे डॉ. संदीप गेडाम यांनी सांगितले.

 

औषधोपचाराने कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होतो : कुष्ठरोग हा आजार ‘मायक्रोबॅक्टेरियम लेप्री’ या जंतू पासून होत असून तो अनुवांशिक नाही. हा आजार पूर्वीच्या जन्माचे पाप नाही. कुष्ठरोगाचे मुख्य लक्षण त्वचेवरील बधीर फिक्कट चट्टा हा आहे. जर असे लक्षण आढळून आल्यास ताबडतोब आपल्या गावातील आशा, नर्स किंवा आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून कुष्ठरोग आहे किंवा नाही, याची खात्री करून घ्यावी. या रोगावर सर्व सरकारी दवाखान्यात मोफत औषधोपचार उपलब्ध आहे. औषधोपचाराने हा रोग पूर्णपणे बरा होतो. लवकर निदान, वेळेवर व नियमित उपचाराने विकृती टाळता येते.