चंद्रपूर || जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबीर

चंद्रपूर || जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबीर

Ø 7 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत तालुका क्रीडा संकुल, बल्लारपूर येथे आयोजन

 

चंद्रपूर, दि. 17 : तालुका, जिल्हा, विभाग तसेच राज्यस्तरावर क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानामध्ये भर पडावी व वेळोवेळी क्रीडाक्षेत्रामध्ये होणारे बदल अवगत होण्यासाठी तसेच शालेय शिक्षण, विद्यार्थ्यांना योग्य क्रीडा प्रशिक्षण मिळण्यासाठी क्रीडा शिक्षकांचे अद्यावत प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने, महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण 2012 अन्वये, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूरच्या वतीने जिल्हास्तरावर 100 उच्च माध्यमिक, माध्यमिक व प्राथमिक क्रीडा शिक्षकांचे 10 दिवसीय प्रशिक्षण शिबीर 7 ते 16 फेब्रुवारी 2023 या कालावधीत तालुका क्रीडा संकुल, बल्लारपूर (विसापूर) येथे आयोजित करण्यात येत आहे.

 

क्रीडा संस्कृतीचे संवर्धन प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. खेळामधील बदललेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पद्धती, खेळामधील कौशल्याची ओळख, नवीन खेळाची ओळख, खेळाची शास्त्रोस्त्र माहिती वेळोवेळी शिक्षकांना करून देणे आवश्यक आहे. या प्रशिक्षण शिबिरामध्ये विविध खेळाचे तज्ञ, क्रीडा प्रशिक्षक किंवा संघटनेचे तांत्रिक पदाधिकारी, आहारतज्ञ, शरीरविज्ञान तज्ञ, क्रीडा मानसोपचार तज्ञांचे मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या क्रीडा शिक्षकांना होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने खो-खो, धनुर्विदया, बास्केटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल, मैदानी, बॅडमिंटन, हॅण्डबॉल, जिम्नॅस्टिक, टेबल-टेनिस, कुस्ती, फुटबॉल आदी खेळांचे क्रीडा मार्गदर्शकाव्दारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण शिबिरामधील क्रीडा शिक्षकांना निवास, भोजन, तज्ञाचे मार्गदर्शन, ट्रॅकसुट, टि-शर्ट, शॉर्ट तसेच शासन निर्णयान्वये प्रवास भत्ता देण्यात येणार आहे.

 

अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी आर.बी.वडते यांच्याशी 9975591175 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.