चिमूर तालुक्यात हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ

चिमूर तालुक्यात हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ

 

चंद्रपूर, दि. 10 : चिमूर तालुक्यात हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ 9 जानेवारी 2023 रोजी करण्यात आला असून सदर औषधोपचार मोहीम 19 जानेवारी पर्यंत चिमूर तालुक्यात राबविण्यात येत आहे.

 

या मोहिमेचे उद्घाटन पंचायत समिती सभागृह, येथे तहसीलदार श्री. कोवे, सहाय्यक गटविकास अधिकारी सहारे, गटशिक्षणाधिकारी श्री. नाट यांना प्रत्यक्ष गोळ्या खाऊ घालून करण्यात आले. यावेळी नागपूर विभागाचे सहाय्यक संचालक (हिवताप) डॉ. निमगडे, जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय सल्लागार डॉ. भाग्यश्री त्रिवेदी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतीक बोरकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अश्विन अगडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित पटले व आरोग्य विस्तार अधिकारी श्री. सोरदे प्रामुख्याने उपस्थित होते.

 

या मोहिमेदरम्यान लाभार्थ्यास तीन प्रकारच्या गोळ्या देण्यात येणार आहेत. अव्हरमेक्टिन ही गोळी उंचीनुसार, डी.ई.सी गोळी वयानुसार व अॅल्बेंडाझोल ही गोळी प्रत्येकी एक याप्रमाणे द्यायची आहे. या गोळ्याचे सेवन 2 वर्षाखालील बालकांनी, गरोदर मातांनी, 7 दिवसाच्या स्तनदा मातांनी आणि अति गंभीर आजारी व्यक्तींनी करू नये. सदर गोळ्या उपाशीपोटी घेऊ नये, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.बोरकर यांनी सांगितले आहे.

 

या मोहिमेकरीता 270 चमू व 78 पर्यवेक्षकांची निवड करण्यात आली असून सर्वांनी आपल्या घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करून गोळ्यांचे सेवन करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित पटले यांनी केले आहे.