गोवर रुबेला सिटी टास्क फोर्स समितीची बैठक संपन्न लसीकरण मोहिमेस सुरवात

गोवर रुबेला सिटी टास्क फोर्स समितीची बैठक संपन्न लसीकरण मोहिमेस सुरवात

चंद्रपूर १७ डिसेंबर – गोवर रुबेला रोगांच्या संभाव्य वाढीच्या प्रतिबंधाच्या दृष्टीने सिटी टास्क फोर्स समितीची बैठक १६ डिसेंबर रोजी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली मनपा स्थायी समिती सभागृहात संपन्न झाली.

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील संभाव्य गोवर – रुबेला आजार प्रतिबंधासाठी चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे नियोजनबध्द पावले उचलली जात असून डिसेंबर व जानेवारी महिन्यात विशेष लसीकरण मोहीम आयोजित करण्यात येत आहे. याबाबत आखणी करण्याकरिता महापालिका आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण टास्क फोर्स समितीची बैठक घेण्यात आली.

मनपा प्राथमिक केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्यसेविका यांच्या मदतीने १०० टक्के लसीकरण करणे तसेच एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यास आशा वर्कर द्वारे घरोघरी गोवर रुबेला संबंधी सर्वेक्षण सुरु आहे. शहरातील खाजगी दवाखाने, शाळा तसेच इतरत्र कुठेही ताप तसेच अंगावर पुरळ असलेले संभाव्य रुग्ण आढळल्यास तातडीने मनपा प्राथमिक आरोग्य केंद्रास अथवा परिचारिकांना सूचना करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.

गोवर प्रतिबंधाकरिता 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील लसीकरण न झालेल्या बालकांचे लसीकरण करण्याकरिता विशेष गोवर रुबेला लसीकरण अभियान शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येणार असून 4 आठवड्याच्या अंतराने 2 मोहीमा घेऊन 26 जानेवारी 2023 पर्यंत या मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आले आहे.

या मोहीमेअंतर्गत गोवर आजाराची संभावना नसलेल्या कार्यक्षेत्रात वंचित गोवर रुबेला डोस पहिला व दुसरा पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच संभाव्य गोवर आजार भागात अतिरिक्त गोवर रुबेला डोस देण्यात येणार आहे.या विशेष गोवर रुबेला लसीकरण मोहीमेची पहिली फेरी 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2022 या कालावधीत तसेच दुसरी फेरी 15 जानेवारी ते 25 जानेवारी 2023 या कालावधीत आरोग्य विभागाच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. या मोहीमेअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यात आले असून बालकांना पहिला डोस व दुसरा डोस कश्या प्रकारे देण्यात येईल याबाबत टास्क फोर्सच्या बैठकीत कृती आराखडा सादर करण्यात आला.सदर विशेष गोवर रुबेला लसीकरण मोहीमेची व्यापक प्रसिध्दी विविध माध्यमांतून करण्याचे टास्क फोर्स सदस्यांमार्फत सूचित करण्यात आले असून त्यानुसार आरोग्य विभागामार्फत प्रचार प्रसिध्दी केली जात आहे. तरी 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील बालकांचे त्यांच्या पालकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने कऱण्यात येत आहे.

यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ वनिता गर्गेलवार,डॉ. व्यंकट पांगा,रोटरी क्लब सेक्रेटरी संतोष तेलंग ,जेसीआय अध्यक्ष अभिलाष बुक्कावार,डॉ, विद्या बांगडे,मोरेश्वर मेलारे, ज्ञानेश कंचर्लावार,अब्दुल शेख, डॉ जयश्री वाडे, डॉ अश्विनी भारत, डॉ. योगेश्वरी गाडगे,डॉ अलका आकुलवार, डॉ विजया खेरा, डॉ नयना उत्तरवार, मनपा शिक्षणाधिकारी नागेश नित,डॉ नरेंद्र जनबंधु,डॉ. अतुल चटकी,शरद नागोसे, सतीश अलोने, ज्योती व्यवहारे, शारदा भुक्या, ग्रेस नगरकर,गणेश राखुंडे उपस्थीत होते.