प्रयोगशील शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीसाठी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

प्रयोगशील शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीसाठी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

 

भंडारा, दि. 16 : शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकाव्यतिरिक्त शेतात नवे प्रयोग राबवावे. तसेच नगदी उत्पन्न देणाऱ्या फळ व भाजीपाला पिके घेण्यात यावी, यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धान उत्पादनासोबतच फळबाग व भाजीपाला लागवड करावी या करिता कृषि विभागाकडून शेतकऱ्यांकरिता विविध योजना राबविल्या जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या योजनेचा लाभ घेवून फळबाग व भाजीपाला लागवडीला सुरूवात केली अशा साकोली व लाखणी तालुक्यातील तीन शेतकऱ्यांच्या शेतीला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी काल भेट देवून पाहणी केली.

साकोली तालुक्यातील सानगडी येथील अशोक लिचडे यांनी कृषि विभागाच्या योजनेतून 6 एकर शेतीमध्ये रेड ॲपल, बोरची 1 हजार 200 झाडे व 5 एकर शेतीमध्ये सिताफळाची 2 हजार 800 झाडे लावली. भंडारा, देवरी, गोंदिया व नागपूर बाजार पेठेत रेड ॲपल, बोर व सिताफळे विक्रीला जात असून लिचडे यांना फळबागेमधून चांगले उत्पन्न मिळत आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या शेतातील डी कंपोजरद्वारे खत निर्मीतीची माहिती जाणून घेतली.

लाखणी तालुक्यातील कोलारी (पटाची) येथील मोरेश्वर शिंगणजुडे यांनी कृषि विभागाच्या योजनेतून 8 एकर शेतीमध्ये केळी, पपई व टरबूज ची लागवड केली आहे. भंडारा बाजारपेठेत फळे विक्रिला जात असून शिंगणजुडे यांना फळबागेमध्ये चांगले उत्पन्न मिळत आहे. आंतरपिकामध्ये अद्रक, लसून व इतर भाजीपाला पिके ते घेत असतात.

लाखणी तालुक्यातील पालांदूर येथील शंकर नंदनवार यांनी कृषि विभागाच्या योजनेतून 6 एकर शेतीमध्ये भाजीपाला लागवड केली आहे. त्यामध्ये कारले, टमाटर, लवकी, काकडी, भेंडी, फुल कोबी, पता कोबी व रेड कॅब्रेज चे उत्पादन होत असून त्यांना यातून चांगले उत्पन्न मिळत आहे. रोज 18 ते 20 लोकांना ते शेतामध्ये रोजगार उपलब्ध करून देतात. नंदनवार यांची तीन सुशिक्षीत मुले असून तीपण त्यांच्या सोबत शेती करतात. अशोक लिचडे, मोरेश्वर शिगणजूडे व शंकर नंदनवार यांनी त्यांच्या गावातील व बाजूच्या इतर शेतकऱ्यांना फळबाग व भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहित करावे, असे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी त्यांना सांगितले.

लाखणी तालुक्यातील कन्हेरी येथील भास्कर टिचकूले यांनी 2 एकर शेतीमध्ये मोहगणीची 888 झाडे लावली. ही झाडे 10 वर्षात 80 मीटर उंच व खोडाची गोलाई 1 मीटर पर्यंत होते. मोहगणीच्या झाडांच्या बियांपासून औषधी निर्मिती केली जाते व त्याचे लाकूड जहाज बांधनी, वाद्य तयार करणे व फर्निचर तयार करण्यासाठी वापरले जाते. पाहणी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी टिचकूले यांच्या शेतात एक वृक्ष लावले.