एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

 

भंडारा, दि. 8: भंडारा जिल्हा धान पिक उत्पादक जिल्हा असून दुबार पिक पेरणीमध्ये हरभरा व गहू पिकांची लागवड करण्यात येते. शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी फळबाग व भाजीपाला पिकांच्या लागवडीवर भर देण्याची आवश्यकता आहे. या करिता कृषि विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेच्या विविध घटकांसाठी शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

 

आतापर्यंत 469 शेतकऱ्यांना सुटी फुले, पॅक हाऊस, हळद लागवड, मिरची लागवड, प्लास्टिक मल्चिंग, ड्रॅगन फ्रुट लागवड, हरितगृह व शेडनेट हाऊस उभारणी, सामुहिक शेततळे व ट्रॅक्टर या घटकांकरिता ऑनलाईन पध्दतीने अनुदान अदा करण्यात आले. या योजनेअंतर्गत विविध घटकांचा लाभ घेतल्यामुळे जिल्ह्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांकडे यशस्वी मॉडेल तयार झालेले आहे. तरी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शेतकरी योजना हा पर्याय निवडून शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावे. प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पुर्वसंमती देणे, मोका तपासणी तसेच लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इत्यादी प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याने योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी त्वरीत अर्ज सादर करावे. अधिक माहिती करिता तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.