राष्ट्रीय लोक अदालतीचे वेळापत्रकात बदल 05 मे ऐवजी 27 जुलै रोजी होणार

राष्ट्रीय लोक अदालतीचे वेळापत्रकात बदल
05 मे ऐवजी 27 जुलै रोजी होणार

दि.18 : सदस्य सचिव, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार  जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये या वर्षातील 2 रे राष्ट्रीय लोक अदालत दि. 05 मे 2024 रोजी असल्याचे कळविण्यात आले होते. परंतु त्यात अंशता बदल करण्यात येत असून सदर राष्ट्रीय लोक अदालत लोकसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे दि. 08 एप्रिल 2024 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार दि. 05 मे 2024 रोजी होणारे या वर्षातील 2 रे राष्ट्रीय लोक अदालत आता दिनांक 27 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील तडजोडीस पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी दावे असे प्रलंबित वाद तसेच दाखलपुर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. यासाठी पक्षकार, अधिवक्ता तसेच नागरिकांनी राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मोठया प्रमाणात आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढावीत. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य यांनी केले आहे.
राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, 138 एन.आय.अॅक्ट प्रकरणे, भु-संपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बँकेशी संबंधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन,मोबाईल कंपनी संबंधीत वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे, पंतसंस्थेशी संबंधीत प्रकरणे, नगर परिषद व ग्रामपंचायत अंतर्गत कर आकारणीचे प्रकरणे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथील प्रकरणे इत्यादी प्रकरणांचा समावेश असणार आहे. लोकन्यायालयात पारीत झालेल्या अवॉर्डची न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे अंमलबजावणी करता येते. लोकन्यायालयात तडजोड केल्याने लोकांचा वेळ, श्रम व पैसा यांची बचत होते. दोन्ही पक्षकारांमध्ये असलेले वैर संपुन गोडवा, चांगले संबंध निर्माण होतात.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई मार्फत संपुर्ण राज्यात 27 जुलै 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे नियोजन केले आहे. तरी सर्वांनी दिनांक 27 जुलै 2024 रोजी होणा-या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आर.आर. पाटील यांनी केले आहे.