प्रधानमंत्री पथविक्रेता स्वनिधी योजनेची कर्ज प्रकरणे बँकांनी त्वरीत निकाली काढावी – आयुक्त विपीन पालीवाल 

प्रधानमंत्री पथविक्रेता स्वनिधी योजनेची कर्ज प्रकरणे बँकांनी त्वरीत निकाली काढावी – आयुक्त विपीन पालीवाल          

सिबिलचे कारण देता येणार नाही

चंद्रपूर १५ नोव्हेंबर – केंद्र शासनाची महत्वाची योजना प्रधानमंत्री पथविक्रेता स्वनिधी योजनेच्या अनुषंगाने शहरातील सर्व बँकांनी कर्ज प्रकरणे त्वरीत निकाली काढण्याचे निर्देश आयुक्त विपीन पालीवाल यांनी आढावा बैठकीत दिले.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना व Day – Nulm अंतर्गत वैयक्तीक कर्ज मंजुरीबाबत आढावा बैठक मनपा स्थायी समिती सभागृहात आयोजीत करण्यात आली होती. बैठकीस जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक प्रशांत घोगळे,विविध बँकेचे प्रतिनिधी तसेच पथविक्रेत्यांचे प्रतिनिधी उपस्थीत होते.

प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत २२८८ लाभार्थ्यांना बँकेतर्फे कर्ज वाटप आतापर्यंत झाले आहे. १०५८ लाभार्थ्यांनी १० हजार रुपये कर्ज घेऊन परतफेड केली आहे. सदर योजना सुरु होऊन २ वर्षे झाली आहे ते पाहता लाभार्थ्यांची कर्ज वाटप प्रकरणे फार कमी झाले आहेत. याबाबत गती येणे अतिशय आवश्यक आहे. सदर योजना शासनाच्या फ्लॅगशिप प्रोग्राम अंतर्गत असल्याने केंद्र व राज्य शासनाकडुन नियमित आढावा घेतला जात आहे त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना कर्ज मंजुर करणे, जी प्रकरणे मंजुर आहेत त्यांना वितरीत करणे या सर्व प्रक्रिया सर्व बँकांकडुन लवकरात लवकर होणे अपेक्षीत आहे.

सिबिल स्कोर खराब असल्याचे कारण देऊन बँकांना कर्ज प्रकरण नामंजूर करता येणार नाही तसेच अर्जदाराचे डोमिसाईल पडताळणी करणेही प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत आवश्यक नाही याची बँकांनी दखल घ्यावी. १० हजार रुपये कर्जाची लाभार्थ्याने परतफेड केल्यावर पोर्टलवर बँकेने ते खाते बंद करणे आवश्यक आहेत अन्यथा २० हजार रुपयांच्या कर्जासाठी तो लाभार्थी पात्र ठरणार नाही. या योजनेचे लाभार्थी हे पथविक्रेते असल्याने मानवतेचा दृष्टिकोन ठेऊन कार्य करावयास हवे.

 

* कागदपत्रे काय लागतात? – आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, पॅनकार्ड (ऐच्छिक),पासपोर्ट फोटो.

* कसा कराल अर्ज ? – महानगरपालिकेच्या नागरी उपजीविका केंद्राकडे ( जुबली हायस्कूल समोर ) अर्ज करता येईल. pmsvanidhi.mohua.gov.in या

वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करता येईल.