शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथे कायदेविषयक शिबिर

शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथे कायदेविषयक शिबिर

चंद्रपूर, दि. 8 सप्टेंबर: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व शासकीय रुग्णालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 6 सप्टेंबर रोजी शासकीय रुग्णालय, चंद्रपूर येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी, मानसोपचार तज्ञ डॉ. किरण देशपांडे, डॉ. दिलीप मडावी, डॉ. रफिक मावानी, डॉ. बनकर, डॉ. पानघंटीवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी यांनी प्राधिकरणामार्फत मोफत विधी सहाय्य मिळू शकते तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (मनोरुग्ण व मानसिक अपंग व्यक्ती करीता) योजना 2015 याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच सर्व एच.आय.व्ही.ग्रस्त रुग्णांना झालेला असाध्य रोग समाजामध्ये पसरू नये याची काळजी घेण्याचे आवाहन केले. प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. किरण देशपांडे यांनी मानसिक आरोग्य तसेच संसर्गजन्य रोग झाल्यानंतर घ्यावयाची काळजी याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. तर डॉ. दिलीप मडावी यांनी एच.आय.व्ही. अर्थात एड्स या रोगाबाबत असलेली उपचार पद्धती, प्रतिबंधात्मक उपाय या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डॉ. धनंजय तावाडे यांनी तर आभार अॅड. महेंद्र असरेट यांनी मानले.