9 ते 15 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात रानभाजी महोत्सव Ø शेतकरी व ग्राहकांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

9 ते 15 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात रानभाजी महोत्सव

Ø शेतकरी व ग्राहकांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

चंद्रपूर,दि. 8ऑगस्ट: कृषी विभागातर्फे 9 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव कृषी भवन परिसर, वाहतूक नियंत्रण कार्यालयाजवळ, नागपूर रोड चंद्रपूर येथे राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळून येत असल्याने तसेच रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असल्याने रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविणे व त्यातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्त्रोत मिळावे, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.

मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्य साधारण महत्व आहे. सकस अन्नामध्ये विविध भाज्यांचा समावेश असतो. रानातील म्हणजेच जंगलातील तसेच शेत शिवारातील नैसगिकरीत्या रान पालेभाज्या, फळभाज्या, कंदभाज्यांमध्ये विविध प्रकारचे पौष्टिक व औषधी गुणधर्म असतात. तसेच रानभाज्या नैसर्गिकरीत्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशके, बुरशीनाशके फवारणी करण्यात येत नाही.

जिल्हा तसेच संपूर्ण तालुक्यामध्ये रानभाजी महोत्सव आयोजित होणार आहे. रानभाज्यामध्ये कंदभाज्या जसे, करांदे, कणगर, कडुकंद, कानबाई, अळू आदी आहेत. हिरव्या भाज्यामध्ये तांदुळजा, काठमाठ, कुडा, टाकळा, कोहळा, कुई, पोळ, कवळा, लोथा आदी भाज्या आहेत. फळभाज्यामध्ये करटोली, वाघेडा, चीचुडी, पायार, मोह, कपाळफोडी, काकड आदी तर फुलभाज्यामध्ये कुडा, शेवळ व उळशी तसेच विदर्भातील तरोटा, कुडवाच्या शेंगा या रानभाज्यांची ओळख, आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे महत्व, पाककृती आदीविषयी माहिती शहरी भागातील ग्राहकांना होण्याच्या दृष्टीकोनातून रानभाजी महोत्सव आयोजित करण्याबाबत सुचना प्राप्त आहे. रानभाज्यांबाबत जिल्हा व तालुकास्तर महात्सवातील उत्कृष्ट माहिती,भाज्यांचे संकलन,भाजीची पाककृती केलेल्या शेतकरी,व्यक्तीची निवड करुन त्यांना स्वातंत्र्यदिनी प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.

तरी, जिल्ह्यातील सर्व शेतकरी व ग्राहकांनी या रानभाजी महोत्सवाचा लाभ घ्यावा. महोत्सवाच्या अधिक माहितीकरीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, चंद्रपूर व संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.