प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या लाभासाठी विशेष ऑनलाईन मोहीम

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या लाभासाठी विशेष ऑनलाईन मोहीम

गडचिरोली, दि.30: माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहीत करणे, त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रीत राहावा यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु केली आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजेनचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी 30 नोव्हेंबर व 01 डिसेंबर या कालाधीत ऑनलाईन लाभार्थी नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे यांनी दिली आहे.
मिशन शक्तीच्या मार्गदर्शक सुचनेनुसार प्रधानमंत्री मातृ वंदना 2.0 राज्यात 9 ऑक्टोंबरनुसार लागु झाली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी गडचिरोली जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सर्व आरोग्य सेवा कार्यक्षेत्रांमध्ये 30 नोव्हेंबर ते 01 डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन लाभार्थी नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. ही योजना शहरी व ग्रामीण भागामध्ये लागु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शासनाचे अधिसुचित केलेल्या संस्थेत नोंदणी केली असेल अशाच पात्र महिलांना या योजनेचा लाभ पहिल्या जिवंत अपत्यांसाठी 5 हजार रुपयांचा दोन टप्प्यात ऑनलाईन पध्दतीने देण्यात येतो. 01 एप्रिल 2022 नंतर दुसरे अपत्य मुलगी असल्यास 6 हजार रुपयांचा लाभ एकाच टप्प्यात देण्यात येत आहे. ही योजना शासकीय सेवेत खाजगी सेवेत किंवा त्या मातेला 6 महिन्याची प्रसुती रजा मंजुर असणाऱ्या माता वगळून इतर सर्व मातांना देय आहे.
गडचिरोली जिल्हयातील पात्र महिलांनी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.प्रमोद खंडाते, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.प्रफुल हुलके यांनी केले आहे.

योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागपत्रे (कोणत्याही एका ओळखपत्राच्या
पुराव्याची प्रत जोडणे आवश्यक आहे.)
i) ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष रुपये 8 लाखापेक्षा कमी आहे. (Income certificate)
ii) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला. (Cast Certificate)
iii) ज्या महिला अंशत: (40%) किंवा पुर्ण अपंग आहेत (दिव्यांग जन)
iv) बीपीएल शिधापत्रिकाधारक महिला (BPL Ration Card)
v) आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(PMJAY) अंतर्गत महिला लाभार्थी.
vi) ई-श्रम कार्ड धारण करणाऱ्या महिला
vii) किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी
viii) मनरेगा जॉब कार्ड घेतलेल्या महिला
ix) गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका (AWW) अंगणवाडी मदतनीस
(AWHs) /आशा कार्यकर्ती (ASHs).
x) राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) 2013 अंतर्गत शिधापत्रिकाधारक महिला लाभार्थी.

दिनांक 30 नोव्हेंबर 2023 व 01 डिसेंबर 2023 रोजी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचा अहवाल व कार्यक्रमाची निगरानी करण्याची जवाबदारी कु.अश्विनी मेंढे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक व चंदु वाघाडे, जिल्हा कार्यक्रम सहाय्यक, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, गडचिरोली यांची असणार आहे