वीज पडणे, वज्राघातापासून नागरिकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना

वीज पडणे, वज्राघातापासून नागरिकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना

चंद्रपूर, दि. 7 ऑगस्ट : राज्यात मान्सून कालावधीत वीज पडणे, वज्राघात होणे याचे प्रमाण अधिक असल्याने जिवीत व वित्तहानी होत असते. ती एक नैसर्गिक आपत्ती असून जिवितहानी व वित्तीय हानी टाळण्यासाठी उपायोजना करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने राज्यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. नागरिकांनी अशा आपत्तीपासून बचाव करण्याच्या दृष्टीने काय करावे व काय करू नये यामध्ये दिलेल्या बाबींचा अवलंब करावा.

वज्राघात- सतर्कता व चेतावणी ही अति वेगवान वारे, अति पर्जन्य आणि काळे ढग, घोंगावणारे गडगडाटी वादळ, जवळचे झंझावात, जास्त किंवा अधिक जास्त प्रमाणात मेघगर्जना होत असते. विज ही सामान्यपणे उंच वस्तूवर पडते. कोणतेही स्थान हे पूर्णपणे सुरक्षित नाही परंतु , काही स्थाने इतर ठिकाणापेक्षा सुरक्षित आहेत. मोठी बांधकामे, छोट्या किंवा खुल्या बांधकामापेक्षा जास्त सुरक्षित असतात. जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्राच्या बाहेरही वज्राघात होऊ शकतो. वज्राघात सतत एकाच ठिकाणी होऊ शकतो. सामान्यतः बाहेर पडलेल्या व्यक्तीच वज्राघातामुळे जखमी किंवा मृत्यू पावतात. वज्राघात बाधित, जखमी व्यक्तीस आपण मदत करू शकताे, त्याच्या शरीरात कुठल्याही प्रकारचा विद्युत प्रवाह सुरू नसतो. त्या व्यक्तीस तात्काळ व त्वरित मदत करावी.

काय करावे

पूर्वतयारी म्हणून नागरिकांना वज्राघातापासून बचावासाठी जनजागृती करावी. विजेवर चालणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वातानुकूलित यंत्रे बंद ठेवावीत. आपल्या घराच्या आजूबाजूला वाळलेली झाडे, मृत झाडे व फांद्या काढून टाकावीत.

परिसरात वादळी वारे (गडगडाटी वारे), विजा चमकत असल्यास, घरात असल्यास घराच्या खिडक्या व दरवाजे बंद ठेवावे, घराचे दरवाजे, खिडक्या व कुंपणापासून दूर राहावे. मेघगर्जना झाल्यास 30 मिनिटे घराच्या आतच राहावे. घराबाहेर असल्यास त्वरित सुरक्षित निवा-याच्या ठिकाणाकडे ( मजबूत इमारतीकडे) प्रस्थान करावे. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटरसायकल व सायकल यांच्यापासून दूर राहावे. गाडी चालवत असल्यास सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करावा व गाडी सुरक्षित ठिकाणी लावतांना मोठ्या झाडापासून तसेच पुराचे पाणी येत असल्यास अशा ठिकाणी वगळून लावावे. खुल्या ठिकाणापेक्षा सामान्यतः खिडक्या बंद असलेल्या, धातूपासून तयार झालेली वाहने (बस, मोटार) चांगली आश्चर्यस्थळे होऊ शकतात. उघड्यावर असल्यास, शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये झाकावे. जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा. मोकळ्या तसेच लटकत्या विद्युत तारांपासून दूर राहावे. जंगलामध्ये दाट,लहान झाडाखाली, उताराच्या जागेवर निवारा घ्यावा. इतर खुल्या जागेवर दरीसारख्या खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करावा (परंतु, अचानक येणाऱ्या पुरापासून सावध रहावे), जर जमिनीच्यावर पाणी आल्यास ताबडतोब सुरक्षित निवारा शोधून काढावा.

विज पडल्यास, वज्राघात झाल्यास

त्वरित रुग्णवाहिका व वैद्यकीय मदत बोलवावी. वज्राघात बाधित व्यक्तीस त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्यावी. त्याला हात लावण्यास धोका नसतो. ओल्या व थंड परिस्थितीत बाधित व्यक्ती व जमिनीच्या मध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा, जेणेकरून हायपोथरमीयाचा धोका कमी होईल. इजा झालेल्या इसमास, त्याचे श्वसन बंद असल्यास तोंडावाटे पुनरुत्थान प्रक्रिया अवलंबावी. हृदयाचे ठोके बंद असल्यास कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाची हृदय गती सीपीआर चा वापर करून सुरू ठेवावी. रुग्णाचा श्वास व नाडी सुरू असल्यास इतर दुखापतीसाठी, आघातासाठी तपासणे ( भाजणे, ऐकू न येणे, न दिसणे). आदी.

काय करू नये

गडगडाटीचे वादळ आल्यास, उंच जागांवर, टेकडीवर, मोकळ्या जागेवर, समुद्रकिनारी, स्वतंत्र झाडे, रेल्वे, बस, सहलीची आश्रयस्थाने, दळणवळणाची टाॅवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी इत्यादी टाळावे.

घरात असल्यास वायरद्वारे जोडले गेलेले फोन, मोबाईल व इतर इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये. अशा आपत्कालीन वेळी कॉर्डलेस व वायरलेस फोनचा वापर करावा. परंतु, ते भिंतीला जोडलेले नसावे.

गडगडीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. या दरम्यान आंघोळ करणे, हात धुणे, भांडी, कपडे धुणे ही कार्य करू नये. काँक्रीटच्या जमिनीवर झोपू नये किंवा उभे राहू नये. प्रवाहकीय पृष्ठभागांशी संपर्क टाळावा जसे, धातूची दारे, खिडक्यांची तावदाने, वायरिंग व प्लंबिंग नळ आदी.

घराबाहेर असल्यास मेघर्जनेच्या वेळी विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नये. वाहनाच्या धातू किंवा विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. अंधातरी लटकणाऱ्या, लोंबणाऱ्या केबलपासून लांब राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.