ऐकार्जुना येथे 25 हेक्टरवर उभे राहणार उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन केंद्र…

ऐकार्जुना येथे 25 हेक्टरवर उभे राहणार उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन केंद्र

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून कृषी विकासाला चालना

चंद्रपूर दि. 5 : चंद्रपूर जिल्ह्यात भाजीपाला पिकांची उत्पादकता, गुणवत्ता, बिजोत्पादन, काढणी पश्चात तंत्रज्ञान आदी विषयांवर संशोधन व्हावे, एवढेच नव्हे तर विदर्भातील भाजीपाला पिकासंदर्भात सुधारीत तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून ऐकार्जुना (ता. वरोरा) येथे उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन केंद्र उभे राहत आहे.

कापूस उत्पादन संशोधन केंद्राप्रमाणेच जिल्ह्यात भाजीपाला संशोधन केंद्र असावे, असा विचार एक महिन्यापूर्वी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. याबाबत श्री. मुनगंटीवार यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केली. ना.मुनगंटीवार यांच्या मागणीला अल्पावधीतच कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी मान्यता देऊन याबाबतचा आदेश जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी (दि.3 जानेवारी) पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्याकडे सुपूर्द केला. त्यामुळे आता ऐकार्जुना येथे 25 हेक्टर जागेवर 31 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात येणा-या भाजीपाला संशोधन केंद्राचा मार्ग मोकळा झाला आहे.

भारत हा भाजीपाला उत्पादनात चीन नंतर जगात दुस-या क्रमांकावर आहे. जगात घेतल्या जाणा-या एकूण भाजीपाला उत्पादनाच्या 15 टक्के भाजीपाला उत्पादन भारतात होते. भाजीपाला उत्पादनासाठी लागणारा कमी कालावधी, जास्त उत्पादन, भरपूर प्रमाणात उपलब्ध असणारी आहार पोषण मुल्य व शेती क्षेत्रात आणि शेती बाहेरील क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता यामुळे भाजीपाला हा महत्वाचा घटक मानला जातो. भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेच्या निकषानुसार प्रति व्यक्ती प्रति दिन 300 ग्रॅम भाजीपाला आहारात घेणे आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्षात प्रतिव्यक्ती ऐवढा भाजीपाला आपल्या देशात उपलब्ध नाही. भाजीपाल्याची अयोग्य काढणी, हाताळणी आणि टिकविण्याच्या अपु-या सुविधेमुळे उत्पादीत भाजीपाल्याचे जवळपास 30 ते 40 टक्के नुकसान होते.

*जिल्ह्यात भाजीपाला लागवडीस मोठा वाव* : विदर्भातील अनुकूल हवामान व जमीन यामुळे बहुतेक सर्वच भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. चंद्रपूर जिल्ह्यात प्रामुख्याने मिरची, हळद, वांगी, टोमॅटो, कांदा, फुलकोबी, पत्ताकोबी, मुळा इत्यादी भाजीपाल्याची पिके घेतली जातात. चंद्रपूर जिल्ह्यात प्रमुख भाजीपाला पिकाखाली एकूण 2432 हेक्टर क्षेत्र असून त्यापासून 17802 मेट्रीक टन उत्पादन होते. जिल्ह्यातील लागवडीखालील जमीन मुख्यत: खोल गर्दकाळी (56.60 टक्के), उमळ काळी जमीन (25.5 टक्के), मध्यम गर्द काळी जमीन (10.5 टक्के) असून पर्जन्यमान 1100 ते 1500 मि.मी. आहे. भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी जिल्ह्यात उपयुक्त जमीन, मुबलक पाणी व मजुरांची उपलब्धता असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात भाजीपाला लागवडीस मोठा वाव आहे.

*भाजीपाला संशोधन केंद्राचा उद्देश* : भाजीपाला पिकात अनुवंश शास्त्राचा अभ्यास करून सुधारीत / संकरीत वाण विकसीत करणे व गुणवत्तापूर्ण उत्पादनास चालना देणे. भाजीपाला पिकांच्या देशी वाणांचे संवर्धन करणे आणि या पिकांच्या लागवडीस चालना देणे. दुर्मिळ अशा रानभाज्यांचे संवर्धन व लागवड करणे. भाजीपाला पिकांचे लागवड तंत्रज्ञान विकसीत करून गुणवत्तापूर्वक उत्पादन वाढविणे. पिकांच्या दर्जेदार उत्पादनासाठी ठिबक सिंचन, फर्टिगेशन इत्यादी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करणे. भाजीपाला पिकांचे रोपवाटिका व्यवस्थापन व सुधारीत तंत्रज्ञान विकसीत करणे. बिजोत्पादन तंत्रज्ञान विकसीत करणे. संरक्षित भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान विकसीत करणे. भाजीपाला पिकांवर येणा-या किडी व रोगांचा अभ्यास करून त्यावर नियंत्रणाचे प्रभावी उपाय शोधणे. भाजीपाला पिकांची प्रक्रिया, मुल्यवर्धन आणि साठवणूक यावर संशोधन करणे. मुल्यवर्धन करून त्यावर आधारीत प्रक्रिया उद्योगास चालना देणे. भाजीपाला पिकांच्या सुधारीत लागवड तंत्रज्ञानाचे शेतक-यांना प्रशिक्षण देणे. सेंद्रीय भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञानाचे संशोधन आणि प्रात्यक्षिक करणे. जैविक आणि अजैविक तणाव कमी करण्यासाठी तंत्राचे मानकीकरण तसेच विदर्भातील भाजीपाला पिकांच्या विविध बाबींवर संशोधन करून आलेल्या निष्कर्षाबाबत शेतक-यांना अवगत करणे.