हर घर तिरंगा अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीचा होणार सत्कार

हर घर तिरंगा अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीचा होणार सत्कार

चंद्रपूर, दि. 7 ऑगस्ट : केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत “हर घर तिरंगा” अभियान राबविण्यात आहे. या अभियानांतर्गत नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी करायची आहे. यासाठी ग्रामपंचायत तसेच विविध कार्यालय, स्वस्त धान्य दुकान या मार्फत झेंडे उपलब्ध करून देण्यात येईल.

चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायती 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये ग्रामपंचायत अंतर्गत ध्वजसंहितेचे पालन करून शंभर टक्के घरावर ध्वज उभारणी करतील, अशा ग्रामपंचायतींना प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक (शिल्ड व प्रमाणपत्र) देऊन गौरविण्यात येणार आहे.

सदर पारितोषिक हे तालुक्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन ग्रामपंचायतींना देण्यात येतील. यासाठी तालुकास्तरावर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात आले असून सदस्य म्हणून बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी तर सदस्य सचिव म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी असतील. तालुकास्तरीय समितीने तालुक्यातील ग्रामपंचायतींची तपासणी व निवड करून तालुकास्तरावर लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक देऊन संबंधित ग्रामपंचायतींचा सन्मान करावा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे यांनी कळविले आहे.