गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना स्त्रीरोग तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन

गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना स्त्रीरोग तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन

मनपा आरोग्य विभागाद्वारा जागतिक स्तनपान आठवडा साजरा

चंद्रपूर ५ ऑगस्ट – दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट हे सात दिवस जागतिक स्तनपान आठवडा म्हणून जगात साजरा केले जातात. याअंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिका आरोग्य विभागाद्वारे ७ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना स्त्रीरोग तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे .

यावर्षीच्या जागतिक स्तनपान सप्ताहासाठी – स्तनपानाच्या प्रगतीचे पाऊल : शिकवुया आणि आधार देऊया ही थीम निश्चित करण्यात आली असुन हा सप्ताह सक्षमपणे राबविण्यासाठी केंद्र शासनाने सुचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुषंगाने मनपा आरोग्य विभागाद्वारे गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना डॉ. आईचंवार, डॉ पोद्दार,डॉ. बुक्कावार,डॉ. पल्लवी इंगळे, डॉ.कीर्ती साने,डॉ. धनश्री शेंडे, डॉ. मनीषा घाटे, डॉ. उषा अरोरा, डॉ. नयना उत्तरवार या स्त्रीरोग तज्ज्ञांद्वारे आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. यात स्तनपानाचे महत्व काय? स्तनपानामुळे बाळाला काय फायदे होतात, गरोदर स्त्रियांनी काय पोषक आहार घ्यायला हवा व स्वतःची काळजी कशी घ्यावी यासंबंधी मार्गदर्शनही करण्यात येत आहे.

आज पूर्ण विश्‍वामध्ये स्तनपानाला विशेष महत्व दिले जाते आहे. प्रत्येक स्त्रीला स्तनपान, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर घ्यावयाची काळजी हे कळणे महत्त्वाचे आहे. दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट हे सात दिवस जागतिक स्तनपान आठवडा म्हणून जगात साजरा केले जातात. 1990 साली इटलीतील फ्लोरेंस येथे जागतिक आरोग्य संघटना, UNICEF आणि इतर संघटनांनी एकत्र येऊन इनोसेंटी डिक्‍लेरेशनवर स्तनपानाला महत्त्व देण्यासाठी,वाढवण्यासाठी शिक्कामोर्तब केले. त्यानंतर दरवर्षी जगात स्तनपानाचे महत्त्व जोपासण्यासाठी हा आठवडा साजरा केला जातो. दरवर्षी स्तनपानाला जोडून वेगवेगळी संकल्पना घेऊन स्तनपानाचे समर्थन, संरक्षण, वृद्धीकरण करण्यासाठी जगभरात खुप सामाजिक कार्यक्रम घेतले जातात.