डेंग्यु व कीटकजन्य रोगांबाबत संपूर्ण माहिती ठेवा उपचारापेक्षा प्रतिबंध करा – अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल

डेंग्यु व कीटकजन्य रोगांबाबत संपूर्ण माहिती ठेवा

उपचारापेक्षा प्रतिबंध करा – अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल

मनपा प्रा.आरोग्य केंद्रात मिळणार गप्पी मासे  

चंद्रपूर १७ जुन – डासांद्वारे होणाऱ्या डेंग्यु व इतर कीटकजन्य आजारांची भीषणता निर्माण होऊ नये यासाठी आपले घर व परीसरात डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी तसेच पुर्वनियोजन म्हणुन आवश्यक त्या सर्व उपाययोजना त्वरीत सुरु करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी आरोग्य व स्वच्छता विभागाला आढावा बैठकीत दिले.

आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात डासांद्वारे होणाऱ्या संभाव्य रोगासंदर्भात केल्या जाणाऱ्या प्रतिबंधक व नियंत्रणाबाबत उपाययोजनांची आढावा बैठक चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात घेण्यात आली. पावसाळा लवकरच सुरु होईल, पावसाळ्यात डेंग्यु व इतर कीटकजन्य आजार पसरण्याची भीती असते. डेंग्यूचा मच्छर हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो. त्यामुळे घर व परीसरातील पाणी साठ्यात डासांची उत्पत्ती होणार नाही, यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे.

डेंग्यू रोगास कारणीभूत असणारी एडीस ही मादी डास जमिनीपासून १०० मीटर पर्यंत उडू शकते त्यामुळे आपले घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. आठवड्यातून एक दिवस काही पाण्याची भांडी रिकामी करावी व दुसऱ्या दिवशी इतर भांडी रिकामी करून ठेवावी व पाणी भरलेली भांडी घट्ट झाकून ठेवावीत. डेंग्यु व इतर कीटकजन्य आजार आजारांबाबत माहिती नसल्याने किंवा अपुरी माहिती असल्याने काही वेळा तो जीवघेणा ठरू शकतो म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी खाऊन टाकतात ज्याने घरातील डासांचा प्रादुर्भाव कमी होतो त्यामुळे नागरीकांच्या सोयीसाठी मनपा शहरी प्राथमीक आरोग्य केंद्रात आता गप्पी मासे ठेवले जाणार आहेत.

शहरात धुरीकरण व औषध फवारणी सातत्याने करा, शाळा,रुग्णालयात प्राधान्याने जनजागृती करा, एमपीडब्लू, एनएम व आशा वर्कर्स मार्फत डास अळी साठी कंटेनर सर्वे काटेकोरपणे करा. आवश्यक तेथे अबेट, टेमिफॉस औषधी टाकण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त यांनी याप्रसंगी दिले.

बैठकीस वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. गर्गेलवार, ज़िल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर, वैद्यकीय अधिकारी ( स्वच्छता) डॉ. अमोल शेळके, डॉ. अतुल चटकी, संतोष गर्गेलवार,शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, पीएचएन, सर्व स्वच्छता निरीक्षक, एमपीडब्ल्यू आणि इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

आपल्या परीसरात डेंग्युचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पुढील गोष्टी अवश्य करा.

१. डेंग्यूचा मच्छर हा स्वच्छ पाण्यात अंडी देणारा असतो त्यामुळे स्वच्छ पाणी साठवून ठेऊ नका.

२. घरी असलेल्या फ्रिजची टॅंक हमखास साफ करा.

३. एकदा भरलेले कुठलेही पाणी सात दिवसापर्यंत साठवून ठेवण्यात येऊ नये.

४. पिण्याच्या पाण्याचा परिसर स्वच्छ ठेवणे व पाणी अशुध्द होऊ नये याची काळजी घ्या.

५. परिसरात कचरा साठू देऊ नका.

६. डास अळी आढळणारी पाण्याची भांडी रिकामी करा.

७. सोसायटी मधे राहणाऱ्या रहिवाश्यांनी जमिनीखालील व जमिनीवरील टाक्या स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.

८. आठवड्यातून एक दिवस काही पाण्याची भांडी रिकामी करावी व दुसऱ्या दिवशी इतर भांडी रिकामी करून कोरडा दिवस पाळा व आपल्या कुटूंबाचे आरोग्य रक्षण करा ,सतर्क राहुन स्वतःची काळजी घ्या.