डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे “सामाजिक न्याय दिन” साजरा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे “सामाजिक न्याय दिन” साजरा

भंडारा, दि. 27 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंती निमीत्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, भंडारा येथे “सामाजिक न्याय दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. आरक्षणाचे जनक, समाजातील दुर्लक्षित मागासवर्गीय दुर्बल घटाकांच्याप्रती विशेष सहानुभूती व सुधारणावादी दृष्टीकोन, मागासवर्गीय दिव्यांग, वृध्द, निराधार, दुर्बल इत्यादी घटकांच्या कल्याणार्थ अनेक पुरोगामी निर्णय अंमलात आणणारे राजे म्हणून ओळख असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आदर्श समाजापुढे विशेषत्वाने यावा या दृष्टीकोनातून त्यांचा जन्मदिवस दिनांक 26 जून हा प्रतिवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा कार्यालयाचे वतीने दि.26 जून, 2022 रोजी सकाळी 11.00 वा. जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजना प्रसंगी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दिप प्रज्वलन व पुष्पमाला अर्पण करुन सामाजिक न्याय दिनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा.श्री.आर.डी.आत्राम, उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, भंडारा, उद्घाटक मा.श्री.प्रदीप चौधरी, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.भंडारा, मुख्य अतिथी मा.श्री.पानझडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. भंडारा, प्रमुख उपस्थिती मा.श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, सहा.आयुक्त, समाज कल्याण, भंडारा व श्रीमती कल्पना भंगारे, जिल्हा व्यवस्थापक, संत रोहिदास चर्मोद्योग महा.भंडारा हे उपस्थित होते.

सर्वप्रथम सर्व उपस्थितांच्या वतीने राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधुन सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहातील, निवासी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. सामाजिक न्याय भवन येथे असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परक्षिा मार्गदर्शन व अभ्यासिका केंद्रातील विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध क्षेत्रात यश संपादन केल्याने त्यांचा सुध्दा सन्मानचिन्ह व प्रमाणपात्र देवून गौरव करण्यात आला. तसेच अनु.जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा, राजेदहेगांव येथे सन 2021-22 सत्रातील इयत्ता 10 व्या वर्गात परिक्षेला बसलेल्या एकूण 40 मुलींपैकी 33 मुली प्राविण्यप्राप्त श्रेणीत तसेच 7 मुलीं प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. निवासी शाळेत अपुरा शिक्षक वर्ग असून सुध्दा इयत्ता 10 वी च्या परिक्षेत 40 पैकी 33 मुलींना प्राविण्य श्रेणीत येण्याकरीता ज्या शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले त्या शिक्षक व मुख्याध्यापक यांचा सुध्दा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित समाजभूषण पुरस्कृत व्यक्ती, जेष्ठ नागरीक यांचा सुध्दा पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, सहा.आयुक्त यांच्या संकल्पनेतुन समाजातील दुर्लक्षीत असलेल्या भंडारा येथील नायकरीना व खुशबुबाई या तृतीयपंथीयांचा साडी-चोळी व आहेर देवून सत्कार केला.

सर्वप्रथम श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त यांनी सामाजिक न्याय दिना निमीत्त राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाची माहिती देवून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी मागासवर्गीय दुर्बल घटाकांच्याप्रती केलेल्या कार्याची माहिती विषद केली. समाजातील दुर्लक्षीत असलेला घटक तृतीयपंथी यांचा सत्कार हा एक आगळा-वेगळा उपक्रम सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेव्दारे राबविल्या जात आहे, तसेच सामाजिक समता कार्यक्रमाअंतर्गत अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांकरीता “एकच ध्यास – 14 तास अभ्यास” हा उपक्रम राबविला ही बाब अभिमानास्पद आहे असे मतप्रदीप चौधरी, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. भंडारा यांनी उद्घाटनपर मनोगत व्यक्त करतांना व्यक्त केले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना आर.डी.आत्राम, उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, यांनी शाहू महाराजांनी त्यांचे कार्यकाळात जातीवाद नष्ट करण्याकरीता प्रयत्न करुन मागासवर्गीय दुर्बल घटकांकरीता केलेल्या कार्याची महती विषद केली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रमोद गणवीर, लघुटंकलेखक यांनी तर आभार प्रदर्शन विलास रामटेके यांनी केले. कार्यक्रमास अभ्यासिकेतील विद्यार्थी, वसतिगृहाचे विद्यार्थी, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी वृंद, कार्यालयातील कर्मचारीवृंद, बीव्हीजी – क्रिस्टलचे कर्मचारी व गणमान्य व्यक्ती उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.