चंद्रपूरच्या ‘ताडोबा महोत्सवात’ विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा संदेश

चंद्रपूरच्या ताडोबा महोत्सवात’ विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा संदेश

Ø वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे ताडोबा पाहायचा योग – ज्युलिया मॉर्ले

Ø तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन

चंद्रपूर, दि. 2 : ‘मिस वर्ल्ड’स्पर्धेच्या संस्थापक ज्युलिया मॉर्ले यांच्यासह जगातील विविध देशातून आलेल्या विश्वसुंदरी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सौंदर्यवती चंद्रपुरातील ताडोबाच्या चांगल्याच मोहात पडल्या. चंद्रपुरातील व्याघ्र संवर्धनाचा मूलमंत्र आपापल्या देशात घेऊन जाण्याचा निर्धार करीत पुन्हा एकदा ताडोबाला भेट देण्याची इच्छाही व्यक्त केली. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढकारातून तीन दिवसीय ‘ताडोबा महोत्सव 2024’चे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह वन्यजीव सद्भावना दूत प्रसिद्ध सिनेअभिनेत्री रविना टंडन, विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक विरेंद्र तिवारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) शोमिता विश्वास, महिम गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आदी उपस्थित होते.

ज्युलिया मॉर्ले म्हणाल्या, ‘ताडोबा व्याघ्र प्रकल्पात अतिशय सुदंर वाघ आहेत. वाघांना वाचविले तरच आपण आपले पर्यावरण आणि सृष्टीचे भविष्य सुरक्षित करू शकतो.’ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमंत्रित केल्याबद्दल मॉर्ले यांनी आभार मानले. जमील अजमल सैद्दी म्हणाले, ‘वनमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे ताडोबा पाहण्याचे सौभाग्य लाभले. ताडोबा एक वरदान आहे. त्यामुळे प्रत्येक वृक्षाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. वन हेच जीवन आहे, असे मानून आपले भविष्य सुरक्षित करा.’

2015 मधील ‘मिस इंडीया’ नवीनी देशमुख म्हणाल्या, ‘वाघ हे दुर्गामातेचे वाहन आहे. वाघ धैर्याचे प्रतिक आहे. पर्यावरणाच्या संवर्धनाकडे आपले दुर्लक्ष झाले म्हणून प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.’ विश्वसुंदरी स्पर्धेतील कॅरोलिना व्हेरिस्का म्हणाल्या, ‘वाघांचे संरक्षण या प्रकल्पाबद्दल ऐकून खूप आनंद झाला. येथे कुटुंबासह वाघ बघण्याचा योग आला. वाघ हा सृष्टीच्या जीवनचक्राचा महत्वाचा भाग आहे. सन 2021 आणि 2022 मधील मिस इंडिया सिनी शेट्टी म्हणाल्या, चंद्रपुरात येऊन आज अतिशय आनंद झाला. वाघांचे संरक्षण या प्रकल्पासाठी काम करण्याची संधी मिळाली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे.’

ऑस्ट्रेलियाच्या क्रिस्टिन लाइज यांनी ‘सेव्ह द टायगर प्रोजेक्ट’ ही अतिशय महत्वाची आणि तेवढीच सुंदर संकल्पना असल्याचे म्हटले. इंग्लडच्या जेसिका म्हणाल्या, ‘येथे येऊन स्वत:ला भाग्यशाली समजत आहे. या कार्यक्रमाचा आम्ही एक भाग बनू शकलो, याचा आनंद आहे. स्पेनच्या पोला म्हणाल्या, वाघ हे धैर्याचे आणि सामर्थ्याचे प्रतिक आहे. जैवविविधतेसाठी वाघ महत्वाचा घटक असून अशा उपक्रमातून पर्यावरणाचे संरक्षण होईल.’

पटनायक यांचा सॅण्ड आर्ट शो :

प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक आणि त्यांच्या चमूने सॅण्ड आर्ट शो मधून ‘वाघ वाचवा’ असा संदेश दिला. यावेळी त्यांनी वाळूचे अतिशय उत्कृष्ट शिल्प साकारले. उपस्थितांनीही त्यांच्या कलाकृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पुस्तकांचे प्रकाशन :  

वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जैवविविधता मॅप ऑफ ताडोबा कॉफी टेबल बुक, ताडोबा डायरीज, प्रमुख गवत प्रजाती, सी.एस.आर. बुकलेट, ट्रिज ऑफ मेळघाट, महाराष्ट्रातील वने आणि वनवार्ता या न्यूज लेटरचे प्रकाशन करण्यात आले.