क्रीडा संकुलाच्या विकासासाठी खनिज विकास निधीतून 8 कोटी देणार -पालकमंत्री विजय वडेट्टीवार

क्रीडा संकुलाच्या विकासासाठी खनिज विकास निधीतून 8 कोटी देणार

-पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर दि. 29 एप्रिल : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली रवी भवन, नागपूर येथे चंद्रपूर, जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत चंद्रपूर, जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली.

या ठिकाणी मुला-मुलींचे वसतिगृह, जिम्नॅशियम, बॉक्सिंग हॉल, प्रशासकीय इमारत, तलवारबाजी प्रशिक्षण केंद्र आदी नव्याने करण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले. सद्यस्थितीत असलेल्या जुन्या इमारती, ज्यामध्ये प्रशासकीय इमारत, मुला-मुलींचे वसतिगृह, जिम्नॅशियम या सर्व निर्लेखित (डीमालिश) करून त्याठिकाणी मल्टीलेव्हल सुविधा उभाराव्यात. याकरीता शासनाच्या 7 कोटीच्या तरतूदी व्यतिरिक्त 8 कोटी रुपये खनिज विकास निधीतून देण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

या बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, विभागीय उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रिडा अधिकारी अविनाश पुंड प्रामुख्याने उपस्थित होते.