काँग्रेसचा १३९ वा स्थापना दिवस जनतेच्या स्मरणात राहील // महामेळाव्यातून परिवर्तनाचा एल्गार पुकारला जाणार

काँग्रेसचा १३९ वा स्थापना दिवस जनतेच्या स्मरणात राहील

काँग्रेसची नागपुरातील सभा देशभरात परिवर्तनाचा संदेश देणारी ठरेल

महामेळाव्यातून परिवर्तनाचा एल्गार पुकारला जाणार

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन

नागपूर, २८
नागपूरच्या पवित्र भूमीतील काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवस अनेकांच्या स्मरणात रहाणार असून ही सभा देशभरात परिवर्तनाचा संदेश देणारी ठरेल असा विश्वास विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

नागपुरात प्रसारमाध्यमांशी श्री.वडेट्टीवार यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

श्री.वडेट्टीवार म्हणाले, वाढती महागाई,बेरोजगारी शेतकरी, कामगार, तरुणांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. सरकारी यंत्रणा वेठीस धरल्या आहेत. सरकारच्या विरोधात आवाज काढणाऱ्यांना शिक्षा केली जात आहे. देश कठीण प्रसंगातून जात आहे त्याला वाचवण्यासाठी काँग्रेसची ही लढाई आहे. परिवर्तनाचा एल्गार या महामेळाव्यातून पुकारला जाणार आहे, या परिवर्तनासाठी ‘हम तैयार है. काँग्रेसचा स्थापना दिवस विदर्भात साजरा होत असुन विदर्भात काँग्रेसला पोषक वातावरण आहे. विदर्भात दहा पैकी सात जागा नक्की जिंकू असा विश्वास आहे.सर्वेक्षणातूनही तशी माहिती समोर येत आहे.

श्री.वडेट्टीवार भारत न्याय यात्रा विषयी बोलताना म्हणाले की, राहुलजी प्रचंड मेहनत करत असून मणिपूर ते मुंबई यात्रा सुरू होत आहे यात्रा बसने असली तरी गावातून पायी प्रवास होणार असून सभाही होणार आहेत. गेली दहा वर्ष देशातील शेतकरी, महिला, गरीब, बेरोजगारांवर, महागाईमुळे सामान्य माणसावर अन्याय झाला आहे. तो दूर करण्यासाठी ही न्याय यात्रा असणार आहे. देशातील हुकुमशाही प्रवृत्ती दलीत , आदिवासी सर्वांवर अन्याय करीत आहे. न्यायासाठी लढणं हा यात्रेमागचा उद्देश असून त्याचा नक्की फायदा होईल असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.