राज्यकर निरीक्षक पदाच्या नियुक्तीसाठी शिफारस प्राप्त….

राज्यकर निरीक्षक पदाच्या नियुक्तीसाठी शिफारस प्राप्त जिल्ह्यातील चार उमेदवारांना पालकमंत्र्याच्या हस्ते नियुक्तीपत्र

Ø 1 मे रोजीच्या रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्र प्रदान

 

चंद्रपूर, दि. 28: महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा 63 वा वर्धापन दिन समारंभ 1 मे 2023 रोजी संपूर्ण राज्यभरामध्ये साजरा होत आहे. यादिवशी कामगार दिनाच्या औचित्याने राज्यभरात ठिकठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन राज्य शासनामार्फत करण्यात येणार आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागात “राज्यकर निरीक्षक” या संवर्गातील एकूण 697 पदाच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब या संयुक्त परीक्षेअंतर्गत घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेअंतर्गत नियुक्तीसाठी शिफारस प्राप्त झालेल्या 361 उमेदवारांना 1 मे रोजी होणाऱ्या राज्यभरातील रोजगार मेळाव्यामध्ये “राज्यकर निरीक्षक” या पदाचे नियुक्तीपत्र संबधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

 

वस्तू व सेवा कर विभाग, नागपूर अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या व राज्यकर निरीक्षक या पदाच्या नियुक्तीसाठी शिफारस प्राप्त झालेल्या 4 उमेदवारांना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते राज्यकर निरीक्षक पदाचे नियुक्तीपत्र कामगार दिनाच्या औचित्याने होत असलेल्या रोजगार मेळाव्यामध्ये देण्यात येणार आहे. असे चंद्रपूरचे, सहायक राज्यकर आयुक्त तथा जिल्हा समन्वयक अधिकारी यांनी कळविले आहे.