राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन Ø जागतिक हिवताप दिन साजरा

राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन

Ø जागतिक हिवताप दिन साजरा

चंद्रपूर दि. 25 एप्रिल : राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेतील मा.सा. कन्नमवार सभागृह येथे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या हस्ते व समक्ष मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या खाऊ घालून पार पडले.

या कार्यक्रमाप्रंसगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संग्राम शिंदे, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथ) दिपेन्द्र लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधीर मेश्राम, डॉ. माधुरी मेश्राम, डॉ. प्रिती राजगोपाल प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रास्ताविकपर मार्गदर्शनात डॉ. राजकुमार गहलोत यांनी भारतात जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार राष्ट्रीय जंतनाशक दिन का राबविण्यात येतो, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच जागतिक हिवताप दिनाचे महत्व विषद केले. सदर मोहीम जिल्ह्यातील सर्व शाळा स्तरावरून यशस्वीपणे राबवू, अशी ग्वाही शिक्षणाधिकारी (प्राथ.) दिपेंद्र लोखंडे यांनी दिली तर राष्ट्रीय जंतनाशक दिन व जागतिक हिवताप दिनाप्रसंगी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सर्व सहकार्य आरोग्य विभागाला लाभेल असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संग्राम शिंदे यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात 25 एप्रिल 2022 रोजी संस्थास्तरावर शाळेमध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम व दि. 29 एप्रिल 2022 रोजी मॉप अप दिन राबविण्यात येत आहे. तसेच दि. 25 एप्रिल ते 2 मे 2022 पर्यंत समुदाय स्तरावर अंगणवाडी केंद्रात राष्ट्रीय जंतनाशक दिन ही मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या जंतनाशक मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आभार जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.प्रतीक बोरकर यांनी मानले. यावेळी जिल्हा परिषदेतील आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.