हरविले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती… महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 88 महिलांना आर्थिक मदत

हरविले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती…

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 88 महिलांना आर्थिक मदत

भंडारा, दि. 7 : कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे अनेकांचे मोडलेले संसार हळूहळू पुर्वपदावर येत आहेत. समाजाच्या औदार्यामुळे काही मदतीचे हात. विधवा माता – भगिनींच्या मदतीला धावून आले. अश्याच मदत करणाऱ्या संस्था म्हणजे सह्याद्री फौंडेशनच्या माध्यमातून आज जिल्ह्यातील 88 महिलांना प्रत्येकी 30 हजार  रुपयांचे धनादेश वितरण करण्यात आले.

जिल्हा नियोजनच्या सभागृहात आज धनादेश वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या हस्ते धनादेश वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुरसुंगे, जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी विजय नंदागवली, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे, जिल्हा समन्वय अधिकारी माविम प्रदीप काठोळे, अध्यक्ष, सह्याद्री फौंडेशन विजय क्षिरसागर, छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान तुमसरचे नितीन धांडे  प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता अमोल उमलकर, प्रशांत वासनिक, मनोज बोपचे, प्रज्वज बुधे, मयूर पुडके, युनेश धांडे, मौसम वानखेडे, अक्षय चव्हाण, प्रज्वल मुके, कुणाल शाहू यांनी परिश्रम घेतले.