कोविड नियम उल्लंघन प्रकरणी ४ हजार २५० रुपयांचा दंड – मनपाच्या पथकातर्फे वाहतूक, आस्थापना आणि मंगल कार्यालयांची तपासणी

कोविड नियम उल्लंघन प्रकरणी ४ हजार २५० रुपयांचा दंड

– मनपाच्या पथकातर्फे वाहतूक, आस्थापना आणि मंगल कार्यालयांची तपासणी

मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166

चंद्रपूर, ता. १३ :- कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संदर्भात प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या पथकाने तिन्ही झोनमध्ये गुरुवारी (दि. १३ जानेवारी २०२२) मुख्य चौक, आस्थापना आणि मंगल कार्यालयाची तपासणी केली. या दरम्यान एका आस्थापनेसह विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींकडून ४ हजार २५० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
 
नव्या आदेशानुसार मनपाच्या पथकाने झोन क्र. ३ मध्ये बंगाली कॅम्प भाजीमार्केट, दुर्गामाता मंदिर, चिकन मार्केट येथे तपासणी केली. याशिवाय ४४ दुकाने आणि ३ मंगल कार्यालये यांची देखील पाहणी करण्यात आली. मात्र येथे कुठेही नियमांचे उल्लंघन आढळले नाही. दरम्यान मास्क परिधान न केलेल्या ४ व्यक्तींकडून २ हजार २०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. झोन क्र. २ मध्ये ४० आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यातील एका आस्थापनेविरुद्ध नियम मोडल्याप्रकरणी दंड आकारण्यात आला. तसेच ५ नागरिकांकडून मास्क न घातल्याप्रकरणी १ हजार ५० रुपयांचा दंड आकारण्यात आला. तर झोन क्र. १ मध्ये ७९ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तसेच मास्क न घालणाऱ्या एका व्यक्तीकडून ५०० रुपये दंड आकारण्यात आला.
 
नागरिकांनी बाहेर फिरताना मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच सर्व पात्र नागरिकांनी आपल्या भागातील जवळच्या लसीकरण केंद्रावरून कोरोना लस अवश्य घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.
संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाची तपासणी
 
प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तूचा वापर करून बनविण्यात आलेल्या नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक व हाताळणी करण्यास मनपाने पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ अन्वये प्रतिबंध केला आहे. नायलॉन मांजाच्या जप्तीसाठी झोननिहाय ३ पथक गठीत करण्यात आले असून, यात मनपासोबत पोलीस विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या पथकाने गुरुवारी, दिनांक १३ जानेवारी २०२२ रोजी शहरातील विविध पतंग विक्रीच्या दुकानात भेटी देऊन तपासणी केली.