व्यावसायिक अभ्यासक्रम दुसरी प्रवेश फेरी अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावे

व्यावसायिक अभ्यासक्रम दुसरी प्रवेश फेरी

अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावे

मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166

चंद्रपूर दि. 6 जानेवारी: सत्र  2021-22 मध्ये बी.एड, एम.एड. व एलएलबी आदी प्रकारच्या सीईटी देऊन व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी त्यांचे ऑनलाइन पद्धतीने सादर केलेले जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव लवकरात लवकर प्रत्यक्ष अथवा पोस्टाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय, चंद्रपूर येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे.

अर्जदारांनी ऑनलाइन सादर केलेल्या प्रस्तावाची छायांकित प्रत, सीईटी प्रत, मूळ शपथपत्रे, फॉर्म नंबर 3 व 17 तसेच जातीदावा सिद्ध करणारे जातीचे व अधिवासाचे मानीव दिनांकापूर्वीचे (अनुसुचित जातीकरिता सन 1950 पूर्वीचे, विमुक्त जाती व भटक्या जमातीकरिता 21 नोव्हेंबर 1961 पूर्वीचे, व इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गाकरिता 13 ऑक्टोंबर 1967 पूर्वीचे) महसुली आणि शैक्षणिक दस्तऐवजांच्या छायांकित प्रती कार्यालयात सादर करून ऑनलाईन भरणा केलेल्या पावतीची पोहोच घ्यावी.

ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यात आलेल्या प्रकरणात अपूर्ण पुराव्यामुळे त्रुटीमध्ये असलेल्या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी अर्जदारांनी दि. 5 ते 7 जानेवारी 2022 रोजी कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळून अर्जदारांना ई-मेलद्वारे पाठविण्यात आलेल्या त्रुटींची पूर्तता तात्काळ करावी, ई-मेलद्वारे त्रुटींची पूर्तता करू शकत नसल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा. म्हणजे अर्जदारांना त्यांच्या प्रकरणात आलेल्या अडचणी दूर करता येतील व ऑनलाइन दस्तऐवज सादर करता येईल. अर्जदारांनी आवश्यक दस्तऐवज सादर करून जात प्रमाणपत्र पडताळणी तात्काळ करून घ्यावी. जेणेकरून, जातवैधता प्रमाणपत्राअभावी प्रवेशापासून कोणताही मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहणार नाही, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून कळविण्यात आले आहे.