नायलॉन मांजा निर्मिती, वापर व विक्री करणाऱ्यावर होणार कार्यवाही

नायलॉन मांजा निर्मिती, वापर व विक्री करणाऱ्यावर होणार कार्यवाही

मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166

चंद्रपूर, दि. 6 जानेवारी :मकर संक्रांतीनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात नागरिकांकडून उडविण्यात येणाऱ्या पतंगाकरिता वापरण्यात येणारा मांजा (दोरा) हा नायलॉन स्वरूपाचा असतो. मकर संक्रांतीच्या अगोदर व नंतर काही दिवस पतंग उडविण्याचे प्रमाण जास्त असते. त्यासाठी नायलॉन मांजा (दोरा) या धाग्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तसेच या मांजामुळे मानवी जीवितास,  पशु-पक्षी यांच्या जीवितास धोका निर्माण होऊन जखमी व मृत होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग यांच्या परिपत्रकानुसार संपूर्ण राज्यात नायलॉन मांजाचा वापर, विक्री व निर्मिती करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(2) अन्वये संपुर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात नायलॉन मांजाच्या वापरामुळे मानव, पशू-पक्षी यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून दि. 5 जानेवारी ते 25 जानेवारी 2022 पर्यंत पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा नायलॉन मांजा याची निर्मिती विक्री व वापरास प्रतिबंध करण्यात येत आहे.

या आदेशाची कडक अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने महानगरपालिका क्षेत्रात मनपा आयुक्त, नगरपरिषद, पंचायत क्षेत्रात संबंधित मुख्याधिकारी आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायत प्रशासन यांनी त्यांच्या क्षेत्रात नायलॉन मांजाची निर्मिती, वापर व विक्री न होण्याच्या दृष्टीने शोध पथके स्थापन करावीत व सदर पथकामार्फत ज्या व्यक्तीकडून नायलॉन मांजाची विक्री, वापर व निर्मिती होत असेल त्यांच्यावर नियमानुसार आवश्यक कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अजय गुल्हाने यांच्या आदेशात नमूद आहे.