चांदा क्लब ग्राउंड येथील मीना बाजार संचालकाला 50 हजार रुपयांचा दंड; कोरोना नियमभंग जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार समितीने केली पाहणी   चंद्रपूर शहर महानगरपालिकेची कारवाई

चांदा क्लब ग्राउंड येथील मीना बाजार संचालकाला 50 हजार रुपयांचा दंड; कोरोना नियमभंग

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार समितीने केली पाहणी  

चंद्रपूर शहर महानगरपालिकेची कारवाई

चंद्रपूर, ता. २ : शहरातील चांदा क्लब ग्राउंड येथे मागील महिनाभरापासून माऊली एकता मीना बाजारच्या वतीने हॅन्डलुम व कंजूमर एक्सपो मध्ये कोविड-19 विषयक वर्तणूक नियमांचे तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदींचे पालन होत नसल्याचे तसेच परवान्यातील इतर अटी व शर्तीचा भंग होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशावरून गठित समितीने प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी केली. त्यात मीना बाजारच्या संयोजकांकडून कोरोनाविषयक वर्तणूक नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी माऊली एकता मीना बाजार यांच्या विरोधात 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंड येथे सुरु असलेल्या माऊली एकता मीना बाजार ठिकाणी १ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी साडेसात वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये गठीत समितीने भेट दिली. या समितीमध्ये तहसीलदार निलेश गौंड, महानगरपालिकेचे उपायुक्त अशोक गराटे, महानगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, रामनगर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक राधिका पाटील यांचा समावेश होता.

या भेटीदरम्यान मीना बाजार व्यवस्थापक भुषण गज्वी हे हजर नव्हते. त्यामुळे येथील उपस्थित त्यांचे प्रतिनिधी कलाम खान यांच्याशी तसेच मौत का कुवा खेळचे व्यवस्थापक तरबेज आलम यांच्याकडून माहिती घेण्यात आली. या ठिकाणी कोणतेही स्थायी कार्यालय आढळून आले नाही. तसेच व्यवस्थापक हजर नसल्यामुळे इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत कोणताही अभिलेख आढळून आला नाही. मीना बाजारच्या प्रवेशद्वाराजवळ एक मुलगा हॅन्डसॅनिटायझर व मास्क वाटप करत असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी जवळपास एक हजार ते बाराशेच्या वर लोक उपस्थित होते. परंतु सदर नागरिक गर्दीने आणि दाटीवाटीने नियमांचे पालन न करता वावरत असल्याचे दिसून आले. उपस्थित लोकांपैकी जवळपास 80 टक्के लोक मास्क न वापरता इथे वावरत असल्याचेही दिसून आले.

मीना बाजारच्या ठिकाणी विविध वस्तू व खाद्यपदार्थांच्या विक्रेत्यांचे 20 ते 25 स्टॉल, तसेच आठ ते दहा पाळणे, झुले व इतर खेळ प्रकार लावल्याचेही निदर्शनास आले. परंतु विक्रेते व व्यवस्थापक मास्क लावलेले नव्हते. त्यांच्याकडून कोविड-19 नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. मीना बाजार ठिकाणी मीना बाजार व्यवस्थापनासाठी कार्यरत कर्मचारी यांच्याकडून कोविड-19 लसीबाबत प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले नाही. तसेच कार्यरत १० होमगार्ड यांनी लसीचा दुसरा डोस घेतल्याचे तोंडी सांगितले. परंतु त्यांच्याकडे प्रमाणपत्र उपलब्ध नव्हते. तसेच येथे कार्यरत पाच बाउन्सर यांना लसीकरण प्रमाणपत्र याबाबत विचारले असता त्यांनी लसीचा पहिलाच डोस घेतल्याचे सांगितले.