मनपाच्या बंपर लसीकरण लकी ड्रा योजनेला १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

मनपाच्या बंपर लसीकरण लकी ड्रा योजनेला १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ


चंद्रपूर, ता. ३० : महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाची टक्केवारी वाढावी व नागरिकांना लसीकरणास प्रोत्साहन मिळावे, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे लसीकरण बंपर लकी ड्रॉ योजना सुरु आहे. या योजनेस मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत आणखी पात्र नागरिकांना बक्षीस जिंकण्याची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी या योजनेस १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. लसीकरण केंद्रावर लसीची पहिली मात्रा घेणारे मनपा हद्दीतील नागरिक यात सहभागी होऊ शकतील.

महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून कोविड लसीकरणास गती देण्यासाठी लसीकरण बंपर लकी ड्रॉ योजना सुरु करण्यात आली. प्रारंभी ही योजना १२ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत होती. मात्र, या योजनेत आणखी नागरिकांना सहभाग घेता यावा, यासाठी १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अधिकाधिक नागरिकांनी आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.