मनपा हद्दीतील विविध मार्ग, चौक आणि उद्यानाच्या नामकरणाचा ठराव

मनपा हद्दीतील विविध मार्ग, चौक आणि उद्यानाच्या नामकरणाचा ठराव

चंद्रपूर, ता. ३० : शहरातील विविध मार्ग, चौक आणि उद्यानाचे नामकरण करण्याचा ठराव चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहात ३० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण आमसभेत घेण्यात आला.

यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, आयुक्त राजेश मोहिते यांची उपस्थिती होती. मनपाच्या नगरसेवकांनी केलेल्या विनंतीवरून नामकरण मागणीस मंजुरी देण्यात आली.
 
नगरसेवक सुभाष कासनगोटूवार यांनी तुळसीनगर, राष्ट्रवादीनगर, वृंदावननगर या परिसरातील राधाकृष्ण हॉलसमोरील मुख्य चौकाला प्रवीणभाई तोगडिया यांचे नाव देण्याचा ठराव पारित मांडला. प्रशांत दानव यांनी विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक १५ मध्ये बुरडकर ले-आऊट व सुलभ शौचालय गोपालपुरी समोरील नवनिर्मित उद्यानाला गोपालकृष्ण उद्यान असे नाव तर विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक १५ मधील बजाज पॉलीटेक्निक कॉलेजजवळील नवनिर्मित उद्यानाला बालवीर उद्यान नाव देण्याचे सुचविले.

देवानंद वाढई यांनी वडगाव प्रभाग क्रमांक आठमधील साई मंदिरपासून माऊली अपार्टमेंटपर्यंतच्या रस्त्याला साईश्रद्धा असे नामकरण, पोटदुखे ते काळे ते बल्की यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याला साईगर्भा, इंगळे ते उमाटे यांच्या घरासमोरील रस्त्याला साईचाफा, स्नेहनगर- बोरकर लेआउट येथील उद्यानाला स्नेहाराई उद्यान, ओपन स्पेसच्या उद्यानाला श्री गजानन महाराज उद्यान, हवेली गार्डन काकडे ले-आउट उद्यानाला त्रिमूर्ती उद्यान, डॉ. भट्ट ते श्री अशोक जीवतोडे यांच्या घराकडे जाणार्‍या रस्त्याला साईकेशरी नाव देण्याची विनंती केली. तसेच शास्त्रीनगर प्रभागमधील जलशुद्धीकरण केंद्र ते डॉ.  देवतळे नर्सिंग होम पर्यंतच्या रोडचे काम पूर्ण झाले असून, आमदार सुधीर मुनगंटीवार आणि महापौर राखी कंचर्लावार यांच्या हस्ते लोकार्पण झाले आहे. या रस्त्याचे नामकरण भगवान बिरसा मुंडा असे करण्यात यावे, हनुमान नगर डीआरसी रोड येथील हनुमान नगर नाना-नानी पार्क हे नाव देण्याऐवजी आचार्य श्रीराम स्मृती हनुमान नगर असे नाव देण्याचा ठराव सर्वांनुमते पारित करण्यात आला.