भंडारा : न्याय प्रत्येकाला मिळायला पाहिजे  – अंजू शेंडे यांचे प्रतिपादन

न्याय प्रत्येकाला मिळायला पाहिजे  – अंजू शेंडे यांचे प्रतिपादन

भंडारा, दि. 17 : जिथे अधिकार डावलले जातात तिथे अन्याय होतो. समाजातील दुर्बल घटक किंवा गरीब व्यक्ती यांच्यावर अन्याय होत असेल तर ते न्यायालयापर्यंत येऊ शकत नाही अशा व्यक्तींकरीता विधी सेवा प्राधिकरणाची सेवा उपलब्ध आहे. विधी सेवा प्राधिकरणामार्फत नागरिकांना न्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंजू शेंडे यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा मार्फत बालदिनी जनजागृती व संपर्क अभियान राबविण्यात आले त्याच्या समापन कार्यक्रमानिमित्त त्या बोलत होत्या. संविधानानुसार दिलेल्या मूलभूत हक्कांचे तसेच मूलभूत कर्तव्य असे पर्यंत पालन करायला पाहिजे. विधी सेवा प्राधिकरणामार्फत वेळोवेळी कायद्याचे ज्ञान देण्यात येते. प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून विधी सेवा प्राधिकरण कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने 2 ऑक्टोबर पासून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतभर जनजागृती व संपर्क अभियान अंतर्गत अभियानाची सुरुवात केली होती तर 14 नोव्हेंबर रोजी समापन करण्यात आले. या अभियानादरम्यान आयोजित कार्यक्रमाचा कार्यपूर्ती अहवाल सचिव सुहास भोसले यांनी या वेळी सादर केला. या अभियानात जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला तसेच विशेष सहकार्य केलेल्यांना सुद्धा प्रशस्तीपत्र देण्यात आले.

बालदिनी प्रभात फेरी ची सुरुवात जिल्हा न्यायालय भंडारा पासून करण्यात आली व बसस्थानक भंडारा येथे सांगता करण्यात आली. या प्रभातफेरी मध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे, तसेच जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश भंडारा पी. एस. खुणे, दिवाणी न्यायाधीश एम. ए. कोठारी, मुख्य न्यायदंडाधिकारी पी. एच. कर्वे, कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश आर. एस. भोसले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस. पी. भोसले, दिवाणी न्यायाधीश (जलदगती न्यायालय) पी. पी. देशमुख, सह दिवाणी न्यायाधीश आर. पी. थोरे, सह दिवाणी न्यायाधीश पी. ए. पटेल, सह दिवाणी न्यायाधीश चेतना नेवारे, अतिरिक्त सह दिवाणी न्यायाधीश एम. जी. हिंगणघाटे, अतिरिक्त सह दिवाणी न्यायाधीश एस. आर. जैन, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, वकील संघाचे अध्यक्ष आर. बी. वाढई, अधिवक्तागण, न्यायालयीन कर्मचारी, विधीस्वयंसेवक, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह दिवाणी न्यायाधीश सी. वाय. नेवारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अतिरिक्त सह दिवाणी न्यायाधीश एम. जी. हिंगणघाटे यांनी मानले.