घाटे अळीच्या प्रकोपाने विरव्हा येथील शेतकरी झाले हतबल

घाटे अळीच्या प्रकोपाने विरव्हा येथील शेतकरी झाले हतबल

◾नुकसान भरपाई साठी अधिकाऱ्यांना साकडे

*सिंदेवाही :-* यावर्षी पाऊस वेळेवर सुरू झाल्याने हंगामाला चांगलीच मदत झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आप आपली धानाची रोवणी वेळेमध्ये करून घेतली. यावर्षी पीक पाणी सुस्थितीत असताना धानावर कापणीच्या वेळी घाटा अळीचा प्रकोप आल्याने सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा येथील शेतकरी बेजार झाले असून नुकसान भरपाई मिळण्यात यावी साठी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी तथा विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कडे निवेदन देण्यात आले.
सिंदेवाही तालुका हा धान पिकासाठी प्रसिद्ध आहे. या तालुक्यात खरीप हंगामात धानाशिवाय इतर कोणतेही पीक घेतल्या जात नाही. यावर्षी धानाचे पिकावर वातावरणाचा किंवा निसर्गाचा पाहिजे तसा काहीही परिणाम झाला नाही त्यामुळे या तालुक्यातील धानाचे पीक डौलदार होते. नुकतीच धानाची कापणी आणि मळणी सुरू झाली आहे. मात्र विरव्हा येथे धानाच्या पिकांवर घाटा अळी, आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला असून अळीने धानाचे लोंब कुरतळायला सुरू केल्याने यावर्षी हातात आलेले पीक जाण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. इकडून तिकडून कर्ज घेऊन आपल्या शेतीची मशागत करून शेतकऱ्यांनी आपली शेतीची रोवणी केली. खत, औषध फवारणी, निंदन, करून पिकाची काळजी घेऊन पीक जगवले. मात्र ऐन कापणीच्या वेळी लष्करी अळी, आणि घाटे अळी लागली असल्याने तोंडात आलेला आहार गेला असल्याने अनेक शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर उभा होणार आहे. त्यामुळे शासनाने या भागातील शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी विरव्हा येथील शेतकरी तथा पोलीस पाटील राजेंद्र सावसाकडे, देवराव वाकडे, मुकुंदा धारणे, हरिभाऊ बारेकर, शामराव खोब्रागडे, इत्यादी शेतकऱ्यांनी केली आहे.