नागरिकांनो, लसीकरणासाठी आवर्जून पुढे या  – जिल्हाधिकारी संदीप कदम

नागरिकांनो, लसीकरणासाठी आवर्जून पुढे या  – जिल्हाधिकारी संदीप कदम

भंडारा, दि. 15 : कोरोना विरुध्दच्या लढाईत लसीकरण हे एक महत्वाचे शस्त्र आहे. जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करून घेण्यासाठी शासन – प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांचेसुध्दा यात सहकार्य अपेक्षित आहे. सणासुदीच्या दिवसानंतर तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करायचा असेल तसेच त्याचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणासाठी आवर्जून पुढे यावे, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले.

भंडारा शहरातील हुतात्मा स्मारक व लाखणी तालुक्यातील केसलवाडा येथील लसीकरण केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली असता ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, न.प. मुख्याधिकारी विनोद जाधव आदी उपस्थित होते.

गत काही दिवसांपासून जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे, असे सांगून जिल्हाधिकारी कदम म्हणाले, ज्या नागरिकांचा पहिला डोस घेणे बाकी आहे, त्यांनी तो त्वरीत घ्यावा. तसेच ज्या नागरिकांचा दुसरा डोजचा कालावधी आला असेल त्यांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जावून लस घ्यावी.

सणासुदीच्या दिवसानंतर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी तिस-या लाटेची शक्यता वर्तविली आहे. असे असतांनाही नागरिक बिनाधास्त विनामास्क वावरत असल्याचे निदर्शनास आले. ही अतिशय गंभीर बाब असून यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारे गाफील राहू नये, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

92 टक्के लोकांनी पहिला तर 49 टक्के लोकांनी घेतला दुसरा डोज : संपूर्ण भंडारा जिल्ह्यात प्रतिदिन जवळपास 120 ते 130 केंद्रावर लसीकरण सुरू आहे. जिल्ह्यात लसीकरणासाठी एकूण पात्र लाभार्थी 8 लक्ष 98 हजार 400 आहेत. यापैकी आतापर्यंत पहिला डोज घेणाऱ्यांची संख्या 8 लक्ष 30 हजार 167 (92 टक्के) असून दुसरा डोज 4 लक्ष 43 हजार 665 (49 टक्के) नागरिकांनी घेतला आहे. ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सीनचा पहिला डोज घेतला आहे, त्यांनी 28 दिवसानंतर आपला दुसरा डोज तर ज्या नागरिकांनी कोव्हीशिल्डचा पहिला डोज घेतला आहे, त्यांनी 84 दिवसानंतर दुसरा डोज अवश्य घ्यावा. अजूनही कोव्हीशिल्डचा दुसरा डोज न घेणाऱ्या नागरिकांची संख्या 78 हजार 303 असून कोव्हॅक्सीनचा दुसरा डोज न घेणाऱ्यांची संख्या 1 लक्ष 13 हजार 976 आहे.