क्षयरुग्णांना सेवा देणारी खाजगी रुग्णालये व संस्थांनी क्षयरुग्णांची नोंदणी आरोग्य विभागास करणे बंधनकारक

क्षयरुग्णांना सेवा देणारी खाजगी रुग्णालये व संस्थांनी
क्षयरुग्णांची नोंदणी आरोग्य विभागास करणे बंधनकारक

चंद्रपूर, दि.15 नोव्हेंबर:  आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या अनुषंगाने क्षयरोगावर उपचार करणाऱ्या सर्व खाजगी रुग्णालयांनी व संस्थांनी त्यांच्या रुग्णालयात वैद्यकीय सेवा घेणाऱ्या रुग्णांची नोंदणी आरोग्य विभागात करणे बंधनकारक केले आहे.

प्रत्येक क्षयरुग्णांची नोंदणी होऊन त्यांचेवर योग्य उपचार करणे व क्षयरोगाचा प्रसार रोखणे, नियमित उपचारात प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे, हा या नोंदणीमागील मुख्य उद्देश आहे.

नोंदणी करणे अनिवार्य असलेल्या खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय संस्थांमध्ये क्षयरोग निदान करणाऱ्या शहरातील सर्व पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, प्रयोगशाळा, रेडिओलॉजी सुविधा असलेल्या संस्था, क्षयरुग्णांवर उपचार करणारे विविध पॅथीची , सर्व रुग्णालये, डॉक्टर्स, सर्व बाह्य रुग्ण व आंतररुग्ण सुविधा, क्षयरोगाची औषधे विकणारे सर्व औषध विक्रेते यांचा समावेश यामध्ये असणार आहे.

ज्या प्रयोगशाळा, डॉक्टर्स, रुग्णालये, औषध विक्रेते रुग्णांची नोंदणी करणार नाहीत. अशा संस्था, व्यक्तींना क्षयरोगाचा प्रसार करण्यासाठी जबाबदार धरण्यात येऊन भारतीय दंड विधान कलम 269,270 नुसार कारवाई करण्यात येईल. याअंतर्गत दोषी ठरलेल्या व्यक्तींवर किमान 6 महिने ते 2 वर्षापर्यंत कारावास व दंडाची शिक्षा करण्यात येईल.

क्षयरोग निदान करणाऱ्या सर्व प्रयोगशाळा क्षयरुग्णांवर उपचार करणारे विविध पॅथीची,सर्व रुग्णालये, डॉक्टर्स, क्षयरोगाची औषधे विकणारे सर्व औषध विक्रेते यांना दि. 1 जानेवारी 2021 पासून आपल्याकडे निदान होणाऱ्या, उपचार घेणाऱ्या तसेच औषधी घेणाऱ्या सर्व रुग्णांची नोंदणी जिल्हा क्षयरोग कार्यालयात करावी. असे जिल्हा क्षयरोग अधिकारी  डॉ. प्रकाश साठे यांनी कळविले आहे.