वाघाचा उपद्रव असलेल्या गावांमध्ये शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करा पालकमंत्री विजय वडेट्टीवार  ◆ वीज ग्राहक व कंपन्यांनी जनहिताची भावना जपत काम करावे- उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

वाघाचा उपद्रव असलेल्या गावांमध्ये शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करा पालकमंत्री विजय वडेट्टीवार

  वीज ग्राहक व कंपन्यांनी जनहिताची भावना जपत काम करावे- उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

  समाधी, सिदूर, मूल एमआयडीसी, हरंबा, देवाडा, अहेरी, नेरी खांबाडा या सातही उपकेद्रांचे लोकार्पण

चंद्रपूर दि. 13- जिल्ह्यात वाघांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. वाघांचा उपद्रव वाढला असून वन्यजीव – मानव प्राणी संघर्षात गेल्या महिन्यात 17 बळी गेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणेसुद्धा भीतीचे वाटते. म्हणून वाघाचा उपद्रव असलेल्या गावांमधील शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करावा, अशी सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज (दि. 13) केली.

बाबुपेठ येथे आयोजित राजुरा, मुल, सावली, चंद्रपूर आणि चिमुर तालुक्यातील उपकेंद्राच्या आभासी पध्दतीने आज झालेल्या लोकार्पण सोहळयात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्यासह महावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे, प्र.संचालक (वाणिज्य) सतिश चव्हाण, संचालक भालचंद्र खंडाईत, प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता सुनिल देशपांडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, चंद्रपूर हा सर्वाधिक वीज उत्पादन करणारा जिल्हा आहे. त्याबरोबरच येथील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. यावर देखील उपाययोजना केल्या पाहिजेत. जिल्हा नियोजन समितीव्दारे उपकेंद्रासाठी 12 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला असला तरी तो अपुरा आहे. वीज उपकेंद्र वाढवण्यासाठी ऊर्जा विभागाने जास्त निधी जिल्ह्याला उपलब्ध करून दयावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कोरोनाच्या काळात उर्जा विभागाने अखंड काम केले. वीज कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा गौरवपर उल्लेख उर्जामंत्र्यांनी केला. ग्राहक व कंपन्यांनी जनहिताची भावना जपत काम केले पाहिजे. जिल्हयात 5 लाख 64 हजार विद्युत ग्राहक आहेत. या जिल्ह्यात दीनदयाल ग्रामज्योती योजना व एकात्मिक विकास योजनेअंतर्गत 154 कोटी 91 लाख रुपयांची पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्यात आल्याचे उर्जामंत्र्यांनी सांगितले. महावितरणची 17 उपकेंद्रे कार्यरत आहेत. ग्राहकांच्या सेवेसाठी उर्जा विभाग कार्यरत आहेत. मात्र कोरोना संकटाचा वीज कंपन्यांही सामना करावा लागत आहे. याची जाणीव वीज ग्राहकांनीही ठेवावी. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून पुढे जायचे आहे. वीज ग्राहक व वीज कंपन्या या रथाची दोन चाके असल्याची भावना श्री. राऊत यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील शेतकर्यांना वीज जोडणी देण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. या 92.70 टक्के शेतकर्यांना वीज जोडणी देण्यात आलेली आहे. कृषी पंप वीज धोरण-2020 अंतर्गत 0 ते 30 मीटर पर्यंतच्या 1398 वीज जोडण्या प्रलंबित होत्या. त्यापैकी 1296 वीज जोडण्या देण्यात आलेल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात पैसे भरून प्रलंबित असलेल्या वीज जोडण्यांची संख्या 5 हजार 584 एवढी आहे. त्यापैकी 1522 वीज जोडण्या देण्यात आल्या. उर्वरित ग्राहकांना लवकरच वीज जोडणीत असलेल्या अडचणी दूर करण्यात येतील. 3347 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. रुफटॉप सोलर योजनेअंतर्गत 1157 ग्राहकांना लाभ देण्यात आला आहे. जवळपास 25 कोटी रुपये खर्च करून उभारलेली 70 ते 75 हजार वीज ग्राहकांना चांगली सेवा देणार आहेत. नागरिकांना अपेक्षित असलेल्या विकासाबद्दल कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही ऊर्जामंत्री म्हणाले.

यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी नियमित पद्धतीने बिल भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर योजना असावी, अशी सूचना केली .तर आमदार जोरगेवार यांनी प्रलंबित वीजजोडण्या तातडीने देण्याची मागणी केली.

आमदार सुभाष धोटे यांनी आठवडयातील तीन दिवस सकाळी व तीन दिवस दुपारी अशा पद्धतीने शेतकऱ्यांना वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली .