रब्बी हंगामात हरभरा, गहू, करडई व जवस पिकांसाठी बीज प्रक्रिया करण्याचे आवाहन

रब्बी हंगामात हरभरा, गहू, करडई व जवस

पिकांसाठी बीज प्रक्रिया करण्याचे आवाहन

भंडारा, दि. 9 : हरभरा, गहू, करडई व जवस या पिकांची रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. या पिकाच्या रोग नियंत्रणासाठी तसेच उत्पादन वाढीसाठी बीज प्रक्रियेचे अनन्य साधारण महत्व आहे. त्या अनुषंगाने रब्बी हंगामात 1 ते 15 नोव्हेंबर 2021 या कालावधीत बीज प्रक्रिया मोहिमेचे सर्वत्र नियोजन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना बिजप्रक्रिया करुनच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

हरभरा पिकाच्या पेरणीपूर्वी बियाण्यास जैविक 5 ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी. यानंतर 250 ग्रॅम रायजोबियम प्रती 10 किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळूण चोळावे असे बियाणे तासभर सावलीत सुकवावे आणि मगच पेरणी करावी. बियाण्यांची उगवण चांगली होण्यासाठी व रोपावस्थेत उद्भवणाऱ्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास 2 ग्रॅम थायरम व 2 ग्रॅम बाविस्टीक या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी.

गहू या पिकाच्या पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा व्हिटावॅक्स 75 टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी 2.5  ग्रॅम प्रती किलो बियाण्यास लावल्यानंतर 10 किलो बियाण्यास अॅझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धन यांची प्रती 250 ग्रॅम याप्रमाणे जिवाणू संवर्धन लावावे. यामुळे उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ होते.

करडई या तेलबिया पिकाच्या पेरणीपूर्वी बियाण्यास अॅझोटोबॅक्टर अधिक पीएसबी जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया (प्रत्येकी 200 ग्रॅम प्रती 10 किलो बियाण्यास) करावी. मर प्रवण भागात मर रोगाच्या प्रतिबंधासाठी ट्रायाकोडर्मा जैविक बुरशीनाशकाची 4 ग्रॅम प्रती किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी किंवा शेणखतातून जमिनीत मिसळावे. जवस या पिकाच्या पेरणी पूर्वी प्रति किलो बियाण्यास कार्बेन्डाझिम 2 ग्रॅम किंवा थायरम 3 ग्रॅम लावावे.

रब्बी हंगाम 2021-22 यामधील हरभरा, गहू, करडई व जवस या पिकांच्या रासायनिक व जैविक बिजप्रक्रियाचे काटेकोरपणे अवलंब करावे. कृषी विभागामार्फत आपल्याला दिलेल्या बियाण्यांसोबत पण बिजप्रक्रियाकरीता रासायनिक बुरशीनाशके दिले आहेत त्यासोबत बिजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी बिजप्रक्रिया करुनच पेरणी करावी जेणेकरून मर, मुळकुज व इतर रोगांपासून संरक्षण आणि पिकाची चांगल्या वाढीकरीता फायदेशीर होईल. याकरीता कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधीकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अरुण बलसाने यांनी केले आहे .