नव्या इमारतींचे बांधकाम करताना रेनवॉटर हार्वेस्टिंगला प्राधान्य द्या महापौर राखी कंचर्लावार यांचे प्रॉपर्टी एक्सपो मेळाव्यात आवाहन

नव्या इमारतींचे बांधकाम करताना रेनवॉटर हार्वेस्टिंगला प्राधान्य द्या

महापौर राखी कंचर्लावार यांचे प्रॉपर्टी एक्सपो मेळाव्यात आवाहन

चंद्रपूर : शहरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असते. भूगर्भातील जलसाठा कमी असतो. भविष्यात ही समस्या दूर करण्यासाठी नव्य घरांचे बांधकाम करताना रेनवॉटर हार्वेस्टिंगला प्राधान्य द्या, असे आवाहन महापौर राखी कंचर्लावार यांनी केले.

 

चंद्रपूर व नागपूर येथील नामांकित बिल्डर यांचा भव्य प्रोपर्टी मेळावा क्रेडाई चंद्रपूरच्या वतीने चंद्रपुरात आयोजित करण्यात आला आहे. प्रॉपर्टी 2021 या मेळाव्याचे उद्घाटन चंद्रपूरच्या महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला क्रेडाईचे अध्यक्ष संतोष कोलेट्टीवार, सचिव अंकलेश खैरे, प्रमुख पाहुणे महेश साधवानी, एसबीआयचे रिजनल मॅनेजर संजोग भागवतकर, सुधीर ठाकरे, गौरव अग्रवाल यांची उपस्थिती होती.
 
 यावेळी महापौर राखी कंचर्लावार म्हणाल्या, स्वत:चे घर असावे, असे स्वप्न अनेकांकडून पाहिले जाते. वेळप्रसंगी पोटाला चिमटा काढून, अपार कष्ट करून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड केली जाते. हे स्वप्नातील घर साकारताना भविष्यातील पाण्याची दूर करण्यासाठी प्रत्येकाने रेनवॉटर हार्वेस्टिंग केले पाहिजे. त्यासाठी महानगरपालिका सहकार्य करेल, असे आश्वासन दिले. याशिवाय बांधकाम करणाऱ्या व्यवसायिकांनी संकूलातील सांडपाण्याची पाइपलाइन महानगरपालिकेच्या मुख्य लाइनला जोडावी, असे आवाहन केले.