महाकाली यात्रेच्या पार्श्वभुमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल

महाकाली यात्रेच्या पार्श्वभुमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल

Ø नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर, दि. 12 : चंद्रपूर शहरात 14 एप्रिल 2024 पासून महाकाली यात्रेस प्रारंभ होत आहे. अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेसाठी राज्याच्या विविध भागातून भाविकांचे जत्थे दाखल होणे सुरू झाल्याने महाराष्ट्र पोलिस अधिनियम-1951 च्या कलम-33(1)(ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी सुरळीत रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व नियमनासाठी 14 ते 23 एप्रिल 2024 पर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहे. याबाबतच्या सूचना पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी निर्गमित केल्या आहेत.

            सदर कालावधीत अंचलेश्वर गेट ते बागला चौक हा मार्ग सायकल खेरीज सर्व वाहनांकरीता बंद राहणार असून अंचलेश्वर गेट ते बागला चौक हा मार्ग नो पार्कंग झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे. बागला नगर, महाकाली वार्ड, भिवापूर वार्ड या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी शहरात जाण्यासाठी व परत येण्यासाठी भिवापूर-हनुमान खिडकी-दादमहल वार्ड या मार्गाचा वापर करावा. सदरचा मार्ग हा मोटार सायकल व ऑटो यासाठीच राहील. बागला नगर, महाकाली वार्ड, भिवापूर वार्ड या यात्रा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना चारचाकी वाहनांने शहरात किंवा बाहेर जायचे असल्यास लालपेठ कॉलरी-पठाणपुरा गेट-गांधी चौक या मार्गाचा वापर करावा. तसेच शहराबाहेर इतरत्र जायचे असल्यास कामगार चौक मार्गे बायपास रोडचा वापर करावा.

यात्रेकरीता बाहेरून येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था ( नियोजीत वाहनतळ ) : नागपुर मार्गे येणाऱ्या वाहनांकरीता ( कोहिनुर तलाव मैदान ), बल्लारशा मार्गे येणाऱ्या वाहनांकरीता ( महाकाली पोलिस चौकी ते इंजिनिअरींग कॉलेज रोडचे बाजुस ), बल्लारपुर मार्गे येणाऱ्या वाहनांकरीता (बाबुपेठ पोलीस चौकी ) (डी.एड. कॉलेज) तसेच संपुर्ण यात्रा स्पेशल राज्य परीवहन बसेस करीता (न्यु इंग्लीश हायस्कूल मैदान ) या नियोजीत स्थळी पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे, याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी व निर्देशांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.