साईबाबा ज्ञानपीठ कान्‍व्‍हेंट हे बल्‍लारपूर शहरातील उत्‍तम ज्ञानकेंद्र व्‍हावे – आ. सुधीर मुनगंटीवार

साईबाबा ज्ञानपीठ कान्‍व्‍हेंट हे बल्‍लारपूर शहरातील उत्‍तम ज्ञानकेंद्र व्‍हावे – आ. सुधीर मुनगंटीवार

श्री साईबाबा ज्ञानपीठ कान्‍व्‍हेंट बल्‍लारपूर यांनी कोरोना काळातील लॉकडाऊनदरम्‍यान विद्यार्थ्‍यांची १५ टक्‍के फीस कमी करण्‍याचा घेतलेला निर्णय अभीनंदनीय आहे. जे विद्यार्थी अतिशय गरीब आहेत, झोपडीत राहतात, ज्‍यांना ८५ टक्‍के फीस देताना त्रास होत असेल त्‍यांना शक्‍यतोवर पूर्ण फीस कमी करण्‍याबाबत मदत करावी, असे आवाहन विधीमंडळ लोकलेखा समितीच प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. अतिशय दर्जेदार शिक्षण देत विद्यार्थी घडविण्‍याचे काम करणारे श्री साईबाबा ज्ञानपीठ कान्‍व्‍हेंट या शहरातील उत्‍तम ज्ञानकेंद्र ठरावे अशी अपेक्षा त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.
दिनांक १४ ऑक्‍टोबर २०२१ रोजी श्री साईबाबा ज्ञानपीठ कान्‍व्‍हेंट बल्‍लारपूर द्वारा आयोजित कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते श्री चंदनसिंहजी चंदेल, संस्‍थेचे अध्‍यक्ष श्री. लखनसिंह चंदेल, बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, प्राचार्य किरण चंदेल, तहसिलदार संजय राईंचवार, पोलिस निरीक्षक उमेश पाटील, शाळा समिती अध्‍यक्ष श्री. वाचसपती, श्री. गुलाबसिंह चव्‍हाण, प्रकाश पटेल, श्री. गजेड्डीवार, काशीसिंह, शिवचंद द्वीवेदी, समीर केने आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
कार्यक्रमात गोंडवाना विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरींग मध्‍ये दुसरा मेरीट आल्‍याबद्दल शुभम राजभौर या विद्यार्थ्‍याचा सत्‍कार करण्‍यात आला. शुभमकडून प्रेरणा घेत अन्‍य विद्यार्थ्‍यांनीही ज्ञानाचा प्रकाश पसरवावा असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले. यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, कोरोनाच्‍या वैश्विक महामारीत अनेकांनी संकटाचा, आपत्‍तीचा सामना केला. काहींनी या आपत्‍तीचे इष्‍टापत्‍तीत रूपांतर केले. सामान्‍य ज्ञान वाढवित आरोग्‍यासाठी, समाजासाठी काहींनी काम केले. श्री साईबाबा ज्ञानपीठ कान्‍व्‍हेंटने सुध्‍दा या काळात कोणताही शासकीय जी.आर. नसताना विद्यार्थ्‍यांची फीस कमी करण्‍याचा निर्णय घेवून समाजासमोर आगळा आदर्श निर्माण केला आहे. काही दिवसापूर्वी युपीएससी चा निकाल जाहीर झाला. यात चंद्रपूर जिल्‍हयातील तीन मुले उत्‍तीर्ण झालीत. ही अतिशय अभीमानाची बाब आहे. मला काही विशेष करायचे आहे हे जो अन्तर्मनात ठरवतो तोच हे काम यशस्‍वीपणे करू शकतो. युपीएससी परिक्षेत जी मुले उत्‍तीर्ण झालीत त्‍या विद्यार्थ्‍यांनी मी सुरू केलेल्‍या वाचनालयाचा फायदा त्‍यांना झाल्‍याचे सांगीतले. त्‍यावेळी मला विशेष आनंद झाला. मी चंद्रपूर, बल्‍लारपूर, मुल, पोंभुर्णा या ठिकाणी वाचनालय व अभ्‍यासिका निर्माण केल्‍या. त्‍या माध्‍यमातुन स्‍पर्धा परिक्षांची तयारी करण्‍यासाठी पुस्‍तके उपलब्‍ध केलीत. या माध्‍यमातुन जिल्‍हयातील विद्यार्थ्‍यांना लाभ मिळाला याचा विशेष आनंद मला आहे, असेही ते म्‍हणाले.
साईबाबा ज्ञानपीठ कॉन्‍व्‍हेंट च्‍या शिक्षकांनी ऑनलाईन प्रणालीच्‍या माध्‍यमातुन विद्यार्थ्‍यांना शिक्षण दिले. ‘खाली हाथ आए है, खाली हाथ जाना है’ हे बरेचदा आपण ऐकले आहे. पण हे अर्धसत्‍य आहे. शरीर खाली हाथ जाईल मात्र आत्‍मा अमर आहे. वारंवार आपला जन्‍म होणार आहे. मागच्‍या जन्‍मीचे ज्ञान संस्‍कार घेवून येते. यापुढे जग हे ज्ञानाच्‍या आधारावरच पुढे जाणार आहे. समाजाला आपण काही देणे लागतो. या भावनेतुन जो काम करतो तो नेहमी यशस्‍वी होतो. ज्ञानाच्‍या आधारावर भारताने फार पूर्वी कण कण में भगवान है असे सांगीतले. अमेरीकेने हजारों करोडो रूपये खर्च करून केलेल्‍या संशोधनाच्‍या माध्‍यमातुन गॉड पार्टीकल प्रत्‍येक वस्‍तुत आहे असे सांगीतले. यातुनच भारताचे श्रेष्‍ठत्‍व दिसुन येते. साईबाबा ज्ञानपीठ कान्‍व्‍हेंट आजवर निष्‍ठेने ज्ञानदानाचे काम केले आहे. भविष्‍यात हे कॉन्‍व्‍हेंट बल्‍लारपूर शहरातील उत्‍तम ज्ञानकेंद्र ठरेल असा विश्‍वास त्‍यांनी यावेळी बोलताना व्‍यक्‍त केला. शहरातील नागरिकांनी लसीकरणावर भर देत जनजागृती करावी व जास्‍तीत जास्‍त लोकांनी लसीकरणाचा लाभ घ्‍यावा यासाठी प्रयत्‍न करावयाचे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला संस्‍थेचे सर्व पदाधिकारी सदस्‍य, शिक्षक, शिक्षीका, कर्मचारी पालक, विद्यार्थी, निमंत्रीत आदींची उपस्थिती होती.