पात्र व्यक्तींनी लसीचा दुसरा डोस प्राधान्याने घ्यावा  – जिल्हाधिकारी संदीप कदम

पात्र व्यक्तींनी लसीचा दुसरा डोस प्राधान्याने घ्यावा  – जिल्हाधिकारी संदीप कदम

  • पहिला डोस घेणारे 8 लाख

  • गरोदर मातांनी लस घ्यावी

भंडारा,दि.13: कोविड लसीकरणाने जिल्ह्यात गती घेतली असून ‘मिशन कवच कुंडल’ अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. पात्र प्रत्येक व्यक्तीला ‘लस’ देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या वाढत असून नियोजित वेळ झालेल्या व्यक्तींनी लसीचा दुसरा डोस प्राधान्याने घ्यावा, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.
भंडारा जिल्ह्यात ‘मिशन कवच कुंडल’ अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असून या अभियानात प्रत्येक व्यक्तीला लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात कोविड लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 8 लाखांवर गेली आहे. 8 लाख लोकांनी पहिला डोस घेतला असला तरी दुसऱ्या डोससाठी पात्र होऊनही दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. कोरोनावर सध्यातरी लस हा एकमेव उपाय असून लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तींनी दुसरा डोस घेतला नाही (पात्र असतांना) त्यांनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन दुसरा डोस अवश्य घ्यावा असे जिल्हाधिकारी म्हणाले.
गरोदर माता व प्रसूती पश्चात मातेमध्ये लसीकरणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. प्रसूती पूर्व व प्रसूती पश्चात काळात कोविड-19 लसीकरण करणे हे सुरक्षित आहे व कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. मातेला झालेल्या लसीकरणामूळे बाळाचे सुध्दा संरक्षण होते. करीता सर्व गरोदर मातांनी लसीकरण करून घ्यावे. या करीता जवळच्या सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.
जिल्ह्यात गरोदर मातांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील प्रसूतीरोग तज्ज्ञ यांचे मार्गदर्शनात गरोदर मातांचे लसीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत असून गरोदरपणात गरोदर मातेच्या इच्छेनुसार कोविड-19 लसीकरण करण्यात येत आहे. ग्रामीण व शहरी भागातील गरोदर मातांना लसीकरण करुन घेण्याबाबत आशा स्वयंसेविका व अंगणवाडी कार्यकर्ती यांच्या मदतीने कोविड-19 लसीकरणानंतर त्यांचेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत असून लसीकरणापासून होणारे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. जास्तीत जास्त गरोदर मातांचे लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन लस घ्यावी. असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद डॉ. प्रशांत उईके यांनी केले आहे.