15 ऑक्टोबर हा जागतिक हात धुवा दिवस साजरा करा  – मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून

15 ऑक्टोबर हा जागतिक हात धुवा दिवस साजरा करा – मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून

  • साबण गोळा करण्यासाठी रॅलीचे आयोजन

  • ग्रामस्तरावर चौकात आणि सार्वजनिक ठिकाणी होणार हात धुण्याचे प्रात्यक्षिक

भंडारा,दि.13: हातावर असणारे असंख्य रोगजंतू आपल्या आरोग्यासाठी बाधा ठरू शकतात. या रोगजंतूना सर्वांनी साबणाने हातधूवुन एकत्रितपणे दूर केले तर सर्वांचाच भविष्यकाळ हा आरोग्य संपन्न बनेल त्यामुळे ‘आपले भविष्य आपल्याहाता, चला एकत्र पुढे जाऊ या’ या संकल्पनेनुसार जिल्ह्यात ग्राम पंचायतस्तरावर ‘जागतिक हात धुवा दिवस’ साजरा करण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या काळात हात धुण्याचे महत्व वेगाने वाढल्याने ‘हातधुवा दिवसाची संकल्पना’ लोकचळवळीच्या रुपाने रुजविण्यासाठी 15 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्ह्यात सर्व ग्राम पंचायतींमध्ये हातधुवा दिवस साजरा करावा असे आवाहन भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी केले आहे.
2008 पासून 15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक स्तरावर हात धुवा दिन म्हणून साजरा होतो. मागील दोन वर्षांच्या कार्यकाळात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हात धुवा दिवसाचे महत्त्व अधिक पटीने वाढले आहे. राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने हातधुवा दिवस विविध उपक्रम व जनजागृती करुन साजरा करण्याचे निर्देश दिले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरून तालुका व ग्रामस्तरावर हात धुवा दिवस साजरा करण्याबाबत पत्रान्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये गटविकास अधिकारी पंचायत समिती (सर्व) यांच्या स्तरावर हातधुवा दिवस उत्साहात साजरा करण्यात बाबत सरपंच, सचिव यांना निर्देश देण्यात आले आहे. जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर अधिकारी कर्मचारी यांनी हातधुवा दिवस उत्साहात साजरा करावा आणि स्वच्छतेचे महत्व लोकचळवळीच्या रुपाने रूजवावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.
ग्राम पंचायतस्तरावर साबणाने हात धुण्याचे प्रात्यक्षिक व समुदाय बैठका
मागील दीड ते दोन वर्षाच्या कोरोनाच्या कार्यकाळात हात धुण्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. नागरिकांनी साबण, हॅण्डवॉश सारख्या साधनांचा वापर करून हात धुण्यावर अधिक भर दिला. तसेच सॅनिटायझरचा वापर करून हात स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. 15 ऑक्टोबरला जागतिक हात धुवा दिवस भंडारा जिल्ह्यात साजरा करून हात धुण्याचे महत्त्व गाव पातळीवर नागरिकांमध्ये पोहोचविल्या जाणार आहे. याकरिता ग्रामस्तरावर चौकाचौकात, सार्वजनिक ठिकाणी साबणाने हात धुण्याचे प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे. साबणाने हात धुण्याचे महत्त्व व त्याचा आरोग्यास होणारा लाभ याबाबत चर्चा व संवाद साधण्यासाठी ग्रामस्तरावर समुदाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांमध्ये स्वच्छतेचे महत्व खोलवर रुजवले जाणार आहे.
 ग्रामस्तरावर साबण गोळा करण्याकरिता रॅलीचे आयोजन
विद्यार्थी हा नेहमीच सामाजिक बदलाची प्रेरणा राहिलेला आहे. हातधुण्यासाठी साधनांची उपलब्धता हे बहुतांश शाळांसमोर समस्या म्हणून पुढे येते. या समस्येवर मार्ग काढण्याकरिता जागतिक हातधुवा दिवसाच्या निमित्ताने साबण गोळा करण्यासाठी गावातून रॅली काढण्याबाबत निर्देश प्राप्त झाले आहे. या रॅलीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात साबण गोळा होऊन  त्या साधनांचा वापर विद्यार्थ्यांना हातधुण्यासाठी करण्यात येणार आहे. हात धुवा दिनाच्या आदल्या दिवशी प्रत्येक घरातून कमीत कमी एक साबण देण्यात यावी, याकरिता रॅलीच्या माध्यमातून आवाहन करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात साबण उपलब्ध होतील आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी सोईचे होईल शिवाय रॅलीमुळे गावात साबणाने हातधुण्याबाबत लोकांमध्ये व्यापक जनजागृती होणार आहे.
संस्था स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन
शालेयस्तरावर किंवा गावपातळीवर जागतिक हातधुवा दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रांगोळी, वक्तृत्व, चित्रकला हातधुवा पोस्टर तयार करणे आदी स्पर्धाही घेण्यात येणार आहे. यामुळे जागतिक हात धुवा दिनाचे महत्व लोकांमध्ये अधोरेखित होणार आहे.