राष्ट्रीय क्रीडा स्पधेत रंगतेय चुरस Ø 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राचा जेसन कॅस्टेलीनो 11.03 सेकंदाची वेळ नोंदवत अव्वल

राष्ट्रीय क्रीडा स्पधेत रंगतेय चुरस Ø 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राचा जेसन कॅस्टेलीनो 11.03 सेकंदाची वेळ नोंदवत अव्वल

चंद्रपूर दि.29 : बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या  67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या विविध सामन्यात विजयी होण्यासाठी प्रत्येक खेळाडू उत्कृष्ट प्रदर्शन करीत असल्याने स्पर्धेत आता चांगलीच चुरस वाढली आहे.

आज मुली व मुलांच्या 19 वर्षाखालील गटातील थाळी फेक, गोळा फेक, तिहेरी उडी, बांबू उडी, 1500 मीटर,  400 मीटर व 100 मीटर धावण्याची स्पर्धा, 4X100 रिले, 5000 मीटर चालने (मुले), 3000 मीटर चालने (मुली) या स्पर्धेच्याअंतिम सामन्यात खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावत विजय मिळविला. तर प्रथम फेरीसाठी 800 मीटर, 200 मीटर व 400 मीटर अडथळ्याची शर्यत, गट-अ व गट-ब च्या पात्रता फेरीसाठी भाला फेक, थाळी फेक, लांब उडी च्या सामन्यातही स्पर्धेत चांगलीच रंगत आली.

आज झालेल्या विविध अंतिम सामन्यात 19 वर्षाखालील मुलांच्या गटातील 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या जेसन जेम्स कॅस्टेलीनो याने 11.03 सेकंदाची वेळ नोंदवत अव्वल स्थान पटकावले. आंध्रप्रदेशच्या वल्लीगी हिमतेजा याने 11.15 सेकंदात द्वितीय तर महाराष्ट्राच्याच दुर्वेश पवार याने 11.23 सेकंदाची

वेळ नोंदवत तिसरा क्रमांक पटकावला. मुलींच्या गटातील 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत कौन्सिल फॉर द इंडियन स्कूलच्या सिया सावंत ने  11.65 सेकंदाची वेळ नोंदवत अव्वल स्थान पटकावले. महाराष्ट्राच्या अलिझा मौला आणि तामिळनाडूच्या अभिनया आर. यांनी द्वितीय व तिसरा क्रमांक पटकावला. यात अलिझाने 12.17 सेकंद, तर अभिनयाने 12.31 सेकंदाची वेळ नोंदवली.

मुलांच्या गटातील 5000 मीटर चालण्याची शर्यत हरयानाच्या सचिनने  20.26.15 मिनिटांमध्ये पूर्ण करत अव्वल स्थान पटकावले. उत्तर प्रदेशच्या नितीन गुप्ता आणि राजस्थानच्या सचिन गहरवाल यांनी द्वितीय व तिसरा क्रमांक पटकावला. यात नितीनने 20.27.86 मिनिटे, तर सचिन ने 20.39.11 मिनिटांची वेळ नोंदवली.  मुलींच्या गटातील 3000 मीटर चालण्याच्या शर्यतीत राजस्थानच्या खुशबू यादव ने  13.52.29 मिनिटांमध्ये अंतर पूर्ण करत अव्वल स्थान पटकावले. तर हरयानाच्या  पायल  आणि राजस्थानच्या कवीता दुडी  यांनी दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. यात पायलने 14.25.51 मिनिटे, तर कवीताने 14.36.18 मिनिटांची वेळ नोंदवली.

मुलांच्या 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या शहारूख खानने  प्रथम स्थान पटकावले. उत्तराखंडच्या प्रियांशूनने द्वितीय आणि हरयानाच्या बलजीत सिंगने तृतीय  क्रमांक पटकावला. तसेच मुलींच्या 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत छत्तीसगडच्या सानिका राजुर्देने  प्रथम स्थान, उत्तर प्रेशच्या अंशू हिने  द्वितीय  आणि तामिळनाडूच्या अन्सलीन हिने तिसरा क्रमांक पटकावला

मुलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत  केरळच्या अभिराम पी. याने  प्रथम स्थान पटकावले. पश्चिम बंगालच्या स्वपन अहिर याने दुसरा आणि कर्नाटकच्या एन. ध्रुव बल्लाल यांने तिसरा क्रमांक पटकावला. तसेच मुलींच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत स्पर्धेत  केरळच्याच ज्योतिका एम. हिने प्रथम स्थान पटकावले. तर कर्नाटकच्या रिथाश्री आणि केरळच्या सारिका सुनिलकुमार यांनी द्वितीय व तिसरा क्रमांक मिळवला. 19 वर्षाखालील मुलांच्या लांब उडी स्पर्धेत मोहम्मद मुहासने 7.28 मीटर लांब उडी मारत अव्वल स्थान पटकावले. तर हरियानाच्या मोहम्मद अता साजीदने 7.22 मीटर उडी मारून द्वितीय आणि उत्तर प्रदेशच्या मोहम्मद तैसिफने 7.09 मीटर लांब अंतर नोंदवत तिसरे स्थान पटकावले.      उत्तरप्रदेशच्या अनुष्का यादव हिने हॅमर थ्रो मध्ये 65.38 मीटर अंतर नोंदवले.