असंघटीत कामगारांची नोंदणी करुन घ्या -जिल्हाधिकारी संदीप कदम

असंघटीत कामगारांची नोंदणी करुन घ्या -जिल्हाधिकारी संदीप कदम

  • असंघटीत कामगारांना ई-श्रम कार्डचे वाटप

                भंडारा,दि.8: असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत ई-श्रम पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने सहाय्यक कामगार आयुक्त भंडारा यांच्या कार्यालयामार्फत जिल्ह्यातील अंसघटीत कामगारांची नोंदणी करून घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत नोंदणी करून घेण्यात आलेल्या असंघटीत कामगारांना जिल्हाधिकारी संदिप कदम यांच्या हस्ते बुधवारला ई-श्रम कार्डचे वाटप करण्यात आले.
असंघटित कामगारांची जास्तीत जास्त नोंदणी भंडारा जिल्ह्यात व्हावी याकरिता जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत सहाय्यक कामगार आयुक्त भंडारा उ.सु. लोया, सरकारी कामगार अधिकारी भंडारा गुणवंत पंधरे, जिल्हा व्यवस्थापक आपले सेवा केंद्र दुर्गेश भोंगाडे, मुख्याधिकारी नगर परिषद पवनी, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा, उप कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद भंडारा, प्रशासकीय अधिकारी नगर परिषद साकोली व कामगार कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
असंघटीत कामगार जसे की, घरेलु कामगार, बांधकाम कामगार, छोटे व्यापारी, फेरीवाले, टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा व्यापारी, मच्छीमार आणि संबंधित कामगार, विनकाम करणारे इत्यादी यांना त्यांचा लाभ होणार आहे. सदर नोंदणी अंतर्गत असंघटीत कामगारांना युनिर्व्हसल अकाउंट नंबर दिला जाणार आहे. त्यामुळे सरकार दरबारी ई-श्रमकार्डच्या रूपाने अंसघटीत कामगारांना ओळख मिळणार आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यावर संबंधितांना दोन लाख रूपयांचा अपघाती विमा मिळणार आहे. तसेच भविष्यातील सरकारी योजनांचा लाभ मिळू शकणार आहे. दरम्यान नोंदणी अभियानांतर्गत स्वतः नागरी किंवा कामगार सुविधा केंद्र तसेच ई-श्रम पोर्टलमार्फत जास्तीत जास्त अंसघटीत कामगारांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे .