तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्राचे वाटप

तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्राचे वाटप

चंद्रपूर, दि. 16 जून: सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे रोजी जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींचे एक दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी, नॅशनल पोर्टल फॉर ट्रांसजेंडर पर्सन या केंद्र सरकारच्या पोर्टलवर जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींची माहिती भरण्यात आली. त्यासोबतच तृतीयपंथीय व्यक्तींना राशनकार्ड, आधारकार्ड, मतदानकार्ड, बँक पासबूक उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आधारकार्ड सेंटर, निवडणूक विभागाकडून मतदान ओळखपत्र तर अन्न व पुरवठा विभागाद्वारे राशनकार्ड काढून देण्याची प्रक्रिया शासकीय यंत्रणेद्वारे स्टॉल लावून एक दिवसीय शिबिरात विनामूल्य राबविण्यात आली.

या एक दिवसीय शिबिरात समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी उपस्थित तृतीयपंथीय व्यक्तींना मोलाचे मार्गदर्शन करून शासनाद्वारे सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली. तसेच समाज कल्याण विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांची तृतीयपंथीय व्यक्तींनी लाभ घ्यावा. शिबिरामध्ये लागलेल्या स्टॉलमधून कागदपत्रे तयार करून पोर्टलवर माहिती भरावी, आणि ओळखपत्र व प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहनही केले.