नाविन्यपूर्ण शेतमाल लागवड पद्धतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

नाविन्यपूर्ण शेतमाल लागवड पद्धतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

Ø स्मार्ट प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना भेट

चंद्रपूर दि.14: बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प अंतर्गत मंजूर असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी भेट दिली. नंदोरी येथील नरेंद्र जीवतोडे यांच्या शेतावरील रुंदसरी वरंबा पद्धतीने सोयाबीन लागवड, सेंद्रिय हळद मध्ये मधुमक्का लागवड, सेंद्रिय गुळासाठी ऊस लागवड, टोकन पद्धतीने पेरीव धान लागवड आदी नावीन्यपूर्ण शेतमाल लागवड पद्धतीची यावेळी त्यांनी पाहणी केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीच्या स्मार्ट मधील स्वच्छता व प्रतवारी प्रकल्पाचा आढावा घेतला.

या प्रकल्पामध्ये 1080 मेट्रिक टन गोडावूनची उभारणी करण्यात येणार आहे, ज्याचा फायदा कंपनीमधील शेतकऱ्यांच्या मालाची प्रतवारी करण्यास व उत्पादन मूल्य वाढविण्यास होणार आहे. त्यासोबतच जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी एकार्जुना येथील शेतकरी निखील चिंचोलकर यांच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेमधून स्थापित दुग्धप्रक्रिया उद्योगाचीही पाहणी केली. या प्रकल्पामुळे वरोरा तालुक्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यास फायदा होणार आहे. जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प व्हि.एस.टी.एफ (VSTF) यंत्रणेतंर्गत मंजूर असलेल्या कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनी, चिनोरा येथे स्मार्ट अंतर्गत सुरू असणाऱ्या कापूस जिनिंग प्रोजेक्टला भेट देत या प्रकल्पामध्ये उभारण्यात आलेल्या 24 डी.आर. व प्रेसिंग युनिट, स्वच्छता व प्रतवार गोडाऊन, खुले विक्री गोडाऊन,अत्याधुनिक वजन काट्याची पाहणी केली.

उत्पादक कंपनीसोबत 8 हजारहून अधिक शेतकरी जोडले गेले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कापूस पिकाला चांगला भाव मिळण्यासाठी व भविष्यात त्यांच्या कच्च्या मालाच्या गाठी तयार करण्यासाठी याचा नक्कीच फायदा होणार आहे. स्मार्ट योजनेतंर्गत बाजार संपर्कवाढ संकल्पनेचा आढावा यावेळी घेण्यात आला. या संकल्पनेमुळे एकाच छताखाली पणन व विक्रीच्या सर्व बाबी शेतकऱ्यांना शाश्वत स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

भेटीदरम्यान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर, प्रकल्प संचालक (आत्मा) प्रीती हिरळकर, वरोराच्या उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे, उपविभागीय कृषी अधिकारी सुशांत लव्हटे, तहसीलदार योगेश कोटकर, भद्रावतीचे तहसीलदार अनिकेत सोनावणे, भद्रावतीच्या तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव, कांचनी फार्मर प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष यशवंत सायरे व सीईओ बालाजी धोबे, नंदोरी फार्मर प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष नरेंद्र जीवतोडे, शेगावचे मंडळ कृषी अधिकारी विजय काळे, वरोराचे मंडळ कृषी अधिकारी घनश्याम पाटील, कृषी पर्यवेक्षक किशोर डोंगरकर, बंडू डाखरे, नितीन टोंगे, बळीरामजी डोंगरकर, हिरालाल बघेले, व शेतकरी सभासदांची उपस्थिती होती.